पुणे : शिवापूर टोल नाक्यावर 2 किमीपर्यंत रांगा

 महेंद्र शिंदे
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

कोकणात गणेशोत्सवासाठी निघालेल्या नागरीकांमुळे शनिवारी सकाळपासून पुणे-सातारा रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. वाहतूक यंत्रणा वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

खेड-शिवापूर : कोकणात गणेशोत्सवासाठी निघालेल्या नागरीकांमुळे शनिवारी सकाळपासून पुणे-सातारा रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. त्यातच रस्त्यावर पडलेले खड्डे आणि टोल प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पुणे-सातारा रस्त्यावर ठिकठिकाणी सुमारे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. शिंदेवाडी ते सारोळ्यापर्यंत एकुण चार ठिकाणी प्रत्येकी दोन किलोमीटरच्या वाहतूक कोंडीत वेळ वाया जात असल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. 

गणेशोत्सव अवघा एका दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातच शनिवार आणि रविवारची सलग सुट्टी असल्याने शनिवारी सकाळपासून कोकणात गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी नागरीक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळपासून पुणे-सातारा रस्त्यावर साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. मात्र या प्रवाशांना रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. 

वेळु उड्डाणपुलापासून पाठीमागे शिंदेवाडीपर्यंत दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पुढे टोल नाक्यापासून बंगला चौकापर्यंत, वरवे फाट्यापासून शिवरे फाट्यापर्यन्त तसेच कामथडी फाट्यापासून चेलाडी फाट्यापर्यंत  वाहतूक कोंडी झाली आहे. शिंदेवाडीपासून सारोळ्यापर्यन्त सुमारे चार ठिकाणी वाहतूक कोंडीत अडकावे लागत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पुणे-सातारा लेनवर वाहतूक कोंडी असल्याने अनेक वाहन चालक विरोधी बाजूने वाहने पुढे नेत आहेत. त्यामुळे वेळु फाटा, कोंढणपूर फाटा याठिकाणीही वाहतूक कोंडी होत आहे. तसेच पाऊस सुरु झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक अतिशय संथ गतीने सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hevay traffic on Pune-Satara highway