कोल्हापुरात २७ टक्के लोकांना उच्च रक्तदाब

कोल्हापुरात २७ टक्के लोकांना उच्च रक्तदाब

कोल्हापूर - सततची धावपळ, असंतुलित आहार-विहार आणि व्यसनाधीनता आदींमुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांत वाढ होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत आढळले आहे. कोल्हापुरात उच्च रक्तदाबाचे प्रमाण २७ टक्‍क्‍यांवर असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले, अशी माहिती येथील हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अक्षय बाफना यांनी दिली. 

शुक्रवारी (ता. १७) जगभर साजऱ्या होणाऱ्या उच्च रक्तदाब दिनानिमित्त जिल्हा शल्य  चिकित्सकांतर्फे सेवा रुग्णालयात रक्तदाबाबाबत जनजागृती मोहिमेची सुरवात होणार आहे. त्यानिमित्त त्यांनी संवाद साधला. बदलत्या जीवनशैलीमुळे रक्तदाबाचा विकार देशभरात वाढतो आहे, याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने देशात, राज्यात, जिल्ह्यात नुकतीच पाहणी केली. सर्व वयोगटांतील रक्तदाब वरचा १२० च्या खाली व खालचा ८० च्या आसपास असावा; मात्र पारा कमी-अधिक होत असल्यास तातडीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधे घेणे महत्त्वाचे ठरते, असे डॉ. बाफना म्हणाले. 

पूर्व रक्तदाब या वर्गीकरणात १२१ ते १३९ असा वरचा रक्तदाब तर ८० ते ८९ पर्यंत खालचा रक्तदाब असावा. त्याच्या वर पारा असेल तर रक्तदाब मानला जातो. यात संतुलित आहार-विहार, व्यायाम केल्यास रक्तदाबाच्या गोळ्यांची आवश्‍यकता नसते. रक्तदाब १४० वर असेल व खालचा ९० वर असेल तर त्याला उच्च रक्तदाब म्हणतात. 

ज्या लोकांमध्ये अर्धांगवायू, हृदयविकार, हार्ट फेल्युअर, धमन्यांचा आजार किंवा मधुमेह असे विकार असतील, त्यांनी १३० व ८० च्या वर पारा असल्यास तातडीने रक्तदाबाच्या गोळ्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेणे गरजेचे आहे. 
डॉ. बाफना म्हणाले, ‘‘राज्यात सरासरी २५.१ टक्के लोकांना रक्तदाब आहे. सातारा, गडचिरोली व धुळे येथे हेच प्रमाण ३० टक्‍क्‍यांवर आहे. कोल्हापुरात २७.१ टक्के इतक्‍या रक्‍तदाबाच्या व्यक्ती आहेत.’’

वयोगटानुसार राज्यातील रुग्णांची टक्केवारी
१८ ते २९ - १३.६ 
३० ते ३९ - २०.१   
४० ते ४९ - २७.१ 
५० ते ५९ - ३३.७ 
६० वर्षांवरील- ४०.६
(राज्यात २७.१ टक्के पुरुषांना तर २२.८ टक्के महिलांना रक्तदाबाचा विकार आहे.)

कारणे 
३५ पेक्षा जास्त वय असणे, सततचा ताण, लठ्ठपणा, धूम्रपान, तंबाखू, मद्यपान, मिठाचे प्रमाण जास्त, असंतुलित-अनियंत्रित आहार, अनुवांशिकता.

लक्षणे 
घाम फुटणे, डोक्‍यात पाठीमागे दुखणे, पायांना सूज येणे, अकारण अशक्तपणा वाटणे, जास्त वेळ चालल्यावर किंवा जिना चढताना दम लागणे. 

परिणाम 
ब्रेन स्ट्रोक, आंधळेपणा, मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका, धमन्या अरुंद होतात, पाय काळे पडतात, हृदयात ब्लॉकेजेस निर्माण होतात.

काय खायला हवे? 
मॅग्नेशियम, पोटॅशियम जास्त प्रमाणात देणारे पदार्थ उदा. बटाटा, केळी, सोयाबीन, द्विदल धान्य, सूर्यफूल, पालक, साय काढलेले दूध, करवंद व जांभळे यांचा आहार रक्तदाब आटोक्‍यात ठेवण्यास मदत करतो. त्या सोबतच ध्यानधारणा, सलग सहा ते सात तासांची झोप घेणे, नियमित ४० मिनिटे जलद गतीने चालणे यातून रक्तदाबापासून दूर राहता येणे शक्‍य आहे. नियमितपणे तपासणी, नियमित व्यायाम, उपचार वेळीच घेणे, योग्य आहार, तणावमुक्त राहणे हेही तेवढेच महत्त्वाचे आहे, असेही डॉ. बाफना यांनी सांगितले.

काय खाऊ नये?
लोणचे, कॅन फूड, मीठ, बेकरी पदार्थ, डोनेटस्‌, मैदा, साखर, डालडा, दूध, पनीर असे पदार्थ जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास त्यातून रक्तदाब विकाराची शक्‍यता वाढते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com