तळपत्या सूर्याचा "रेड अलर्ट' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

सातारा - विदर्भ, मराठवाड्यात सूर्य तळपू लागल्याने "रेड अलर्ट' जाहीर करण्यात आला. साताऱ्यातही तापमानाने सरासरी ओलांडत 41 अंशांवर पारा नेला असल्याने सातारकरांना उकाडा असाह्य होऊ लागला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच हवेतील उष्मा वाढत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. बालक, वृध्द, महिलांना हे दिवस "ताप'दायक ठरू लागले आहेत. 

सातारा - विदर्भ, मराठवाड्यात सूर्य तळपू लागल्याने "रेड अलर्ट' जाहीर करण्यात आला. साताऱ्यातही तापमानाने सरासरी ओलांडत 41 अंशांवर पारा नेला असल्याने सातारकरांना उकाडा असाह्य होऊ लागला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच हवेतील उष्मा वाढत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. बालक, वृध्द, महिलांना हे दिवस "ताप'दायक ठरू लागले आहेत. 

उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून, काही दिवसांपासून तापमान 41 अंशांवर पोचले आहे. वाढलेल्या तापमानामुळे पाणीटंचाईचा त्रास असलेल्या गावांतील नागरिकांच्या समस्या तीव्र झाल्या आहेत. उष्णतेचे प्रमाण नेहमीपेक्षा अधिक असल्याने जनजीवन विस्कळित झालेले आहे. दुपारच्या वेळी होरपळणाऱ्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी वाहनांची रहदारी थांबलेली दिसते. त्यामुळे दुपारी रस्ते निर्मनुष्य झालेले दिसतात. 

सध्या लग्नसराई सुरू असल्याने सकाळपासून वेगवेगळ्या वाहनांतून सतत लोकांची ये-जा सुरू आहे. मात्र, दुपारच्या उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी शक्‍यतो दुपारपूर्वी किंवा सायंकाळी बसगाड्यांमध्ये गर्दी वाढलेली दिसते. अशावेळी लस्सी, उसाचा रस, आइस्क्रीम आदी दुकानांत सायंकाळी मुलांसह मोठ्यांचीही गर्दी होत आहे. 

ऊष्माघातामध्ये सुरवातीस घाम येण्याचे बंद होते, एकाएकी चक्‍कर येऊ लागते; ओकारी अथवा अतिसाराचे प्रमाण वाढते. रोग्याचा चेहरा लाल होतो. त्वचा गरम आणि शुष्क होते. तापाचे प्रमाणही वाढते. योग्य उपचार न घेतल्यास ताप वाढून मृत्यू होण्याचीही शक्‍यता असते. ऊष्माघात टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात थंड हवेच्या वेळी म्हणजे सकाळी व संध्याकाळीच कामे करावीत. रोज एक अथवा अधिक वेळा स्नान करावे. घरामध्ये हवा चांगली खेळेल आणि जरूर तर खिडक्‍यांवर ओले, साधे वा वाळ्याचे पडदे लावावेत. ग्रामीण भागात शेतात काम करताना शेतकरी, शेतमजूर यांना उन्हाळाचा प्रचंड त्रास होत असतो. काम संपविण्यासाठी दुपारच्या वेळेतही शेतकरी, मजूर कामे करतात. शक्‍यतो सावली असल्यास शेतात काम करावे. अन्यथा सकाळी अथवा सायंकाळी काम करण्यास प्रधान्य देण्याची आवश्‍यकता आहे. गरोदर महिला, वृध्द, रुग्णांनी दुपारी 12 ते सायंकाळी चार पर्यंत उन्हाळ्यात बाहेर पडणे टाळावे. 

भरपूर पाणी प्या 

तापमान वाढले असले तरी, उष्माघातापासून बचाव करण्यासाठी भरपूर प्रमाणात थंड पाणी प्यावे. अधिक घाम आल्यास पाण्यात मीठ-साखर किंवा ओआरएस टाकून प्यायला द्यावे. उन्हाळ्यात सुती व सैल कपडे घालून हवेशीर जागेत बसावे. मुलांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे. ताप आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 

वेधशाळेचा अंदाज  
तारीख........... कमाल तापमान.......... किमान तापमान 
5 मे..................38.......................24 
6 मे..................37.......................24 
7 मे..................36.......................24 

Web Title: high temperature in satara