पारनेरमध्ये कांद्याला उच्चांकी भाव

दौलत झावरे
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे पिके जमीनदोस्त झाली आहेत. कांदाउत्पादकांनाही याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर झाला आहे. जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांमध्ये आवक कमी झाल्याने कांद्याने साडेसहा हजारांचा टप्पा गाठला आहे. गेल्या तीन वर्षांतील हा उच्चांकी भाव आहे. असे असले, तरी शेतकऱ्यांकडे आता कांदाच शिल्लक नाही.

नगर ः जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे पिके जमीनदोस्त झाली आहेत. कांदाउत्पादकांनाही याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर झाला आहे. जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांमध्ये आवक कमी झाल्याने कांद्याने साडेसहा हजारांचा टप्पा गाठला आहे. गेल्या तीन वर्षांतील हा उच्चांकी भाव आहे. असे असले, तरी शेतकऱ्यांकडे आता कांदाच शिल्लक नाही.

रविवारी (ता. तीन) जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांमध्ये 33 हजार 620 कांदागोण्यांची आवक झाली. मागणी जास्त व आवक कमी झाल्याने भावात वाढ झाली. गेल्या तीन वर्षांत कांद्याला चांगला भाव साधला नव्हता. सलग दोन वर्षे तर भाव नसल्यामुळे शासनाने अनुदान दिले. मात्र, जिल्ह्यातील कांदा पावसाने सडल्याने आवक कमी होत आहे. परिणामी, भाववाढ झाली आहे.

पारनेर बाजार समितीत प्रतिक्विंटल साडेसहा हजार रुपये दर मिळाला. त्याखालोखाल इतर पाच बाजार समित्यांत भाव निघाला. श्रीरामपूरमध्ये सात हजार 100, संगमनेरमध्ये आठ हजार 618, राहुरीमध्ये 11 हजार 573, अकोल्यामध्ये 261, पारनेरमध्ये चार हजार 765, तर राहात्यात एक हजार 313, अशा एकूण 33 हजार 620 कांदागोण्यांची आवक झाली आहे.

राहुरीत सर्वाधिक आवक
राहुरी बाजार समितीत कांद्याची सर्वाधिक आवक झाली. अकोले बाजार समितीमध्ये सर्वांत कमी आवक झाली. तेथे कांद्याला सहा हजार 101 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

प्रतवारीनुसार भाव ः श्रीरामपूर ः क्रमांक एक ः 5100 ते 5800, दोन ः 3500 ते 4500, तीन ः 1100 ते 3100, गोल्टी कांदा ः 150 ते 3000. राहाता ः क्रमांक एक ः पाच हजार ते सहा हजार, दोन ः तीन हजार ते 4900, तीन ः 1500 ते 2900, गोल्टी कांदा ः 4400 ते 4800. संगमनेर ः क्रमांक एक ः पाच हजार ते 6100, दोन ः 3500 ते पाच हजार, तीन ः दोन हजार ते साडेतीन हजार, गोल्टी कांदा ः एक हजार ते अडीच हजार.

राहुरी ः क्रमांक एक ः 4800 ते 5850, दोन ः 3300 ते 4795, तीन ः दोन हजार ते 3295, गोल्टी कांदा ः चार हजार ते पाच हजार. अकोले ः क्रमांक एक ः 4501 ते 6101, दोन ः 3501 ते 4500, तीन ः 2200 ते 3500, गोल्टी कांदा ः तीन ते चार हजार. पारनेर ः क्रमांक एक ः 5500 ते 6500, दोन ः 4500 ते 5400, तीन ः एक हजार ते 3500.

टप्प्याने कांदा विक्रीस आणावा
मागणी वाढत असल्याने भाव चांगला साधत आहे. भाव टिकवून ठेवायचा असेल, तर शेतकऱ्यांनी टप्प्याने कांदा विक्रीस आणणे गरजेचे आहे. भाव मिळतो या आशेने जर शेतकऱ्यांनी कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीस आणला, तर त्याचा परिणाम भावावर होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Higher prices for onion in Parner