महामार्गाला फुटले रस्ते!

Sakal-Exclusive
Sakal-Exclusive

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या हॉटेल, धाबे व पंपचालकांनी व्यवसायासाठी पर्यायी रस्ते तयार केले आहेत. या महामार्गाच्या रस्त्यालगत काहींनी संरक्षक कट्टेही फोडले आहेत, तर अनेकांनी भराव टाकून ‘दुकानदारी’साठी वाट मोकळी केली आहे. हॉटेल, पंपचालकांचा हा उपद्‌व्याप अपघातांना निमंत्रण देणारा ठरू शकतो. तरीही त्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) अजूनही गांधारीच्या भूमिकेतच आहे.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत दोन्ही बाजूला हॉटेल, धाबे व पेट्रोलपंप सुरू झाले आहेत. शेंद्रे ते नीरा नदीपर्यंत सहापदरीकरणाचे काम झाले आहे.

महामार्गालगतच्या गावातील लोकांच्या सोईसाठी सेवारस्तेही बनविण्यात आले आहेत. महामार्गावरून सेवारस्त्यांवर उतरण्यासाठी काही ठिकाणीच ते जोडण्यात आले आहेत. परिणामी, वाहनचालक सेवारस्त्यावर उतरत नसल्याने हॉटेलच्या धंद्यावर परिणाम होताना दिसतो. त्यावर अनेकांनी जालीम उपाय शोधला आहे.

भराव टाकून रस्ता
काही व्यावसायिकांनी महामार्गाचे संरक्षक कट्टे फोडून महामार्गच सेवारस्त्याला जोडून घेतला आहे. अनेक हॉटेल व धाबे चालकांनी संरक्षक कठड्यांवर मुरमाचे भराव टाकले आहेत. काही वाहनचालक-मालक हॉटेलमध्ये भोजनासाठी जाताना वाहने महामार्गाच्या कडेच्या लेनमध्ये उभी करतात. जेवण होईपर्यंत वाहने तेथेच उभी असतात. महामार्गावर अशा प्रकारे वाहने उभी करण्यास बंधने असतानाही हे प्रकार वाढू लागले आहेत. वाढे फाटा ते लिंब खिंडीपर्यंत अशी स्थिती दिसते. 

शिट्टी करेल घात...
संरक्षक कठड्यांवर टाकलेल्या भरावावर वॉचमनला थांबवून येणाऱ्या वाहनांना आपल्या हॉटेलकडे आकर्षित करण्याची जबाबदारी दिली आहे. हे वॉचमन सातत्याने शिट्टी मारत वाहने थांबवण्याचा प्रयत्न करतात. वाहनचालकांना हातवारे करून हॉटेलकडे बोलवतात. त्यामुळे अचानक वाहन थांबल्यास मागू येणाऱ्या वाहनांची धडक बसू शकते, अथवा लेन सोडल्याने अपघात होऊ शकतो. 

अपघाताची वाट पाहताय का?
‘एस’ वळण असो की पारगाव खंडाळ्याची भीषण अपघातांच्या घटनांनंतर महामार्गावर सुरक्षिततेचे उपाय राबविले गेले. पुढे थांबलेल्या वाहनांना धडक दिल्याने अनेक विचित्र अपघात सातारकरांनी पाहिले आहेत. आता ही बेकायदेशीर कामे उखडण्यासाठी बळी जावाच लागणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. 

लवकरच कारवाई करणार
बेकायदेशीर भराव, कट्टे तोडले आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना रिलायन्स कंपनीला दिल्या आहेत. यापूर्वीही असे प्रयत्न झाले होते. मात्र, संबंधित व्यावसायिक अरेरावी करतात. पोलिसांनी संरक्षण द्यावे, यासाठी पोलिस अधीक्षकांशी पत्रव्यवहार केला आहे. लवकरच भराव टाकणाऱ्यांवर कारवाई करू, अशी माहिती ‘एनएचएआय’मधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com