चौपदरी रस्त्यावरील वेग मृत्यूला देतोय आमंत्रण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

कऱ्हाड - सैदापूर कृष्णापुलापासून बनवडी फाटा तसेच ओगलेवाडीपर्यंतच्या रस्त्याच्या चौपदरीकरणानंतर वाढलेल्या वाहनांचा वेग नागरिकांच्या जिवावर उठला आहे. किरकोळ अपघात नित्याचेच होत असताना नुकताच एकास जीव गमवावा लागल्याने चौपदरीकरण मृत्यूचा मार्ग बनल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यावर संबंधित विभाग उपाययोजना करणार का? याकडे सैदापूरसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. 

कऱ्हाड - सैदापूर कृष्णापुलापासून बनवडी फाटा तसेच ओगलेवाडीपर्यंतच्या रस्त्याच्या चौपदरीकरणानंतर वाढलेल्या वाहनांचा वेग नागरिकांच्या जिवावर उठला आहे. किरकोळ अपघात नित्याचेच होत असताना नुकताच एकास जीव गमवावा लागल्याने चौपदरीकरण मृत्यूचा मार्ग बनल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यावर संबंधित विभाग उपाययोजना करणार का? याकडे सैदापूरसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. 

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शहराला जोडणाऱ्या रस्त्यांचे चौपदरीकरण करण्यास प्राधान्य दिले. त्यात सैदापूर कृष्णा पुलापासून बनवडी फाटा तसेच ओगलेवाडीपर्यंतच्या रस्त्यावर सुमारे २९ कोटी खर्च करून चौपदरीकरण करण्यात आले. चौपदरीकरणामुळे रस्त्यावरील वाहतूक वाढण्याबरोबरच वाहनांचा वेगही वाढला. बनवडी फाट्यापर्यंतच्या रस्त्यालगत असणारी महाविद्यालये, वसाहती, व्यापारपेठेमुळे रस्ता ओलांडताना आजही स्थानिकांना जीव मुठीत घेवून ये-जा करावी लागते. त्यात प्रामुख्याने महाविद्यालयातील मोटारसायकलस्वारांचा वेग ज्येष्ठ नागरिकांना धडकी भरवणारा असतो. या वाहनांच्या वेगामुळे किरकोळ अपघात सातत्याने होत आहेत. त्यात काहींचे हात-पायही फ्रॅक्‍चरही झाले आहेत. त्यामुळे स्थानिकांनी बांधकाम विभागाकडे वाहनांचा वेग कमी करण्यासाठी अनेकदा गतिरोधक बसवण्याची मागणीही केली. मात्र, संबंधित विभागाचे त्याकडे दुर्लक्ष जिवावर बेतणारे ठरले. त्यामुळेच सैदापूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य जयवंत जाधव यांना अपघातात जीव गमवावा लागला. त्यामुळे आक्रमक झालेल्या सैदापूर व विद्यानगरवासीयांनी ‘रास्ता रोको’ केला. मात्र, संबंधित विभागाच्या दुर्लक्षाने झालेली हानी भरून न येणारी आहे. चौपदरीकरणामुळे नागरिकांची सोय झाली असली तरी वाहनांच्या वेगालाही आवर घालणे गरजेचे आहे. गतिरोधक नसल्याने भरधाव वाहने चालवणे जिवावर बेतणारे ठरू शकते, याचे भान राखणे गरजेचे आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग की राष्ट्रीय महामार्ग? 
पंढरपूर-विजापूर मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्याने या रस्त्याचे नव्याने चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे संबंधित रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे गतिरोधकासह दुरुस्ती करावयाची झाल्यास नेमके कोण करणार? याचा पेच निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राज्य बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग यांच्या कचाट्यात गतिरोधकाचे काम रखडू नये, यासाठी स्थानिक आक्रमक पवित्र्यात आहेत.

Web Title: Highway Road Speed Death Accident