सहापदरीकरणाने शेतकरी अस्वस्थ

Vahagaon-Highway
Vahagaon-Highway

सातारा - सातारा ते कागल महामार्ग क्रमांक ४८ च्या सहापदरीकरणाची कागदोपत्री प्रक्रिया सुरू झाल्याने जिल्ह्यातील ३१ गावांतील रहिवासी, व्यावसायिक, शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने तब्बल ४१ हेक्‍टर क्षेत्राचे भूसंपादन करण्याची नोटीस काढल्याने त्यातून शेकडो घरे जमीनदोस्त होऊन बहुतांश जण बेघर, भूमिहीन होणार आहेत. महामार्ग मंत्रालयाची प्रक्रिया अत्यंत संथगितीने सुरू असल्याने महामार्गालगतचे लोक हवालदिल बनले आहेत.

सातारा ते पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम पूर्णत्वाला निघाले असून, आता सातारा ते कागल (वळसे, ता. सातारा ते मालखेड, ता. कऱ्हाड) या महामार्गाच्या सहापदरीकरण कामास मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ३१ गावांमधील महामार्गालगतच्या ४१ हेक्‍टर २८ गुंठे क्षेत्राचे भूसंपादन करण्याबाबत महामार्ग मंत्रालयाने नोटीस काढली आहे.

यामुळे महामार्गालगतची शेकडो घरे जमीनदोस्त होण्याची शक्‍यता असून, अनेकांची सर्वच शेतजमीन जात असल्यामुळे त्यांनाही रस्त्यावर येण्याची वेळ येणार आहे. शिवाय, अनेक हॉटेल्स, मंगल कार्यालय, दुकान गाळे यांच्याही जमिनी जाणार असल्याने त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. भूसंपादन विभागाने ऑगस्टमध्ये मोजणी मागविली होती. मात्र, महामार्ग विभागाने त्याचे शूल्क न भरल्याने अद्यापही त्याची मोजणी आली नाही.

याबाबत प्रकल्प व्यवस्थापक बाळासाहेब साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असते त्यांनी ‘जानेवारीमध्ये मोजणी होणार असून, त्यानंतर नेमके किती क्षेत्राचे अधिग्रहण केले जाणार आहे, ते निश्‍चित होईल. काही ठिकाणी मॉल्स होणार असल्याने तेथे महामार्गालगत जास्त जमिनीचे अधिग्रहण होईल,’ असे सांगितले.

थेट नोटिसा नाहीत
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने एका वृत्तपत्रामध्ये गट नंबर व क्षेत्राच्या आकाराची जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, वास्तविकता संबंधित रहिवाशी, शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस देण्यात आलेली नाही. अचानकपणे हद्दी निश्‍चित करून गेल्यानंतर शेतकऱ्यांना अधिग्रहण होणार असल्याचे माहिती होऊ लागले. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने संबंधित शेतकरी, नागरिकांना विश्‍वासात घेऊनच अधिग्रहण करणे आवश्‍यक आहे. अन्यथा अधिग्रहणाला तीव्र विरोध होण्याची शक्‍यता आहे. 

३१ गावांचे जाणार क्षेत्र
वळसे, भरतगाव, भरतगाववाडी, बोरगाव, नागठाणे, अतीत, खोडद, काशीळ, रामकृष्णनगर (ता. सातारा), उंब्रज, भोसलेवाडी, वहागाव, वराडे, तासवडे, शिवडे, पेरले, कोर्टी, मुंढे, खोडशी, गोटे, वारुंजी, मलकापूर, बेलवडे हवेली, वाठार, नारायणवाडी, जखीणवाडी, भुयाचीवाडी, नांदलापूर, कापील (पाचवड), आटके, मालखेड (ता. कऱ्हाड).

यापूर्वीच उरमोडी, वांग-मराठवाडी, तारळी धरणग्रस्तांच्या पुनर्वसन करण्यासाठी जमिनींवर स्लॅब टाकले आहेत, तसेच उरमोडी, तारळी धरणाच्या कालव्यासाठीही सातारा तालुक्‍यातील जमिनी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. त्यात आता महामार्गाची भर पडणार असून, त्यामुळे बहुतेक शेतकरी भूमिहीन, तर रहिवाशी बेघर होतील.
- जगन्नाथ पवार, ग्रामस्थ, काशीळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com