‘गोकुळ’कडून गाय दूध खरेदी-विक्री दरात वाढ 

‘गोकुळ’कडून गाय दूध खरेदी-विक्री दरात वाढ 

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गायीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली. ही दरवाढ भरून काढण्यासाठी मुंबई वगळता इतरत्र विक्री दरातही प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली. या दरवाढीची अंमलबजावणी २१ मेपासून होणार आहे. या निर्णयाने गाय दूध उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. 

गायीच्या दूध संकलनात मध्यंतरी मोठी वाढ झाली होती. तथापि या दुधापासून तयार करण्यात येणाऱ्या पावडरचे आंतरराष्ट्रीय बाजारातील दर कोसळल्याने इतर संघांनी गाय दूध खरेदी दरात मोठी कपात केली होती. 

शासनाने विशेष अध्यादेश काढून दरवाढ करण्याचे आदेश दिले होते. ‘गोकुळ’ ने मात्र गायीच्या दूध खरेदीत कपात केली नव्हती. इतर खासगी व सहकारी संघांनी गायीचा दूध खरेदी दर प्रती लिटर १८ रुपयांपर्यंत खाली आणला असताना ‘गोकुळ’ चा दर प्रति लिटर २३ रुपयेच होता. 

‘अमूल’ ने अलीकडेच गाय दूध खरेदी दरात प्रती लिटर २ रुपयांची वाढ केली. या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठवड्यात ‘गोकुळ’ च्या ताराबाई पार्कातील कार्यालयात राज्यातील खासगी व सहकारी दूध संघाच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यात गाय दूध खरेदी दरात वाढ करण्याबरोबरच विक्री दरातही वाढ करण्याचा निर्णय झाला होता. त्याप्रमाणे आज ‘गोकुळ’ चे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी गाय दूध खरेदी व विक्री दरात प्रत्येकी दोन रुपयांची वाढ जाहीर केली. मुंबईत गाय दूध विक्रीचा प्रती लिटर ४५ रुपये दर कायम ठेवला. उर्वरित ठिकाणी गाय दूध विक्रीचा दर प्रती लिटर ४२ रुपयांवरून ४४ रुपये करण्यात आला. 

‘गोकुळ’कडे दररोज गायीचे सुमारे पाच ते साडेपाच लाख लिटर दूध संकलित होते. यापैकी दोन ते अडीच लाख लिटर दुधापासून पावडर तयार केली जाते. उर्वरित अडीच ते तीन लाख लिटर दूध पिशवीतून विकले जाते. यापैकी सर्वाधिक म्हणजे जवळपास पावणे दोन लाख लिटर दुधाची विक्री मुंबईत होते. ‘अमूल’ ने मुंबईत गाय दूध विक्री प्रती लिटर ४५ रुपये केली. मुंबईच्या स्पर्धेत ‘अमूल’ शी सामना करण्यासाठी ‘गोकुळ’ ने गायीचा दूध विक्री दर ४५ रुपये केला आहे. 

नवे विक्री दर असे (प्रती लिटर)
         जुना दर           नवा दर 
मुंबई   ४३ रुपये        ४५ रुपये 
पुणे    ४२               ४४ रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com