हिंदूंनी धर्म रक्षणासाठी सज्ज व्हावे - साध्वी सरस्वती मिश्रा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

वाई - ‘‘हिंदू संस्कृती ही जगात अव्वल आहे. आपली संस्कृती, राष्ट्रधर्म व परंपरेचे रक्षण करणे पाप नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात सामान्य लोकांवर अन्याय व अत्याचार करणाऱ्या दुराचारी प्रवृत्तीच्या अफजल खानाचा वध करून रयतेचे संरक्षण केले. त्यांचा आदर्श समोर ठेवून प्रत्येक हिंदूने धर्म व संस्कृतीच्या संरक्षणासाठी सज्ज व्हावे,’’ असे आवाहन विश्व हिंदू परिषदेच्या प्रचारक साध्वी सरस्वती मिश्रा (मध्य प्रदेश) यांनी केले.

येथील महागणपती घाटावर प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने आयोजित शिवप्रताप दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी नंदगिरी महाराज यांच्या हस्ते साध्वी सरस्वती मिश्रा यांना वीर जिवा महाले, मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड. सुभाष झा यांना पंताजी काका बोकील अभिवक्ता पुरस्कार देऊन गौरविले. या वेळी पंडितराव मोडक, हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष अजय पावसकर, नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, बाबूजी नाटेकर, विनायक सणस उपस्थित होते.

नंदगिरी महाराज म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज महायोद्धा व महायोगी होते. जुलमी अन्यायाविरोधात त्यांनी गनिमी काव्याने उभा केलेला लढा रयतेच्या रक्षणासाठी होता. ते लुटारू नव्हते. इतिहास चुकीचा लिहिला गेला आहे. त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास जगातील सर्व देशांत केला जातो. मात्र, आपल्याकडे होत नाही. त्यासाठी नव्या पिढीने शिवचरित्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

या वेळी ॲड. सुभाष झा यांचे भाषण झाले. या वेळी रंगराव पाटील (कोल्हापूर) यांनी अफजल खान वधाचा पोवाडा म्हटला. वीर जिवा महालेंच्या वंशज सुमनताई सपकाळ यांचा सत्कार केला. समितीच्या निमंत्रक विजयाताई भोसले, गणेश जाधव, पूजा काकडे, ऋषीकेश नेवसे, महेंद्र भोसले, विशाल भिलारे, आदित्य गांधी, सोमनाथ भोसले, अक्षय आरडे यांनी स्वागत केले. गणेश निगडे यांनी मानपत्राचे वाचन केले. आनंद पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Hindus should be ready for Religious protection Saraswati Mishra