हिंदुत्वादी संघटनांची सोलापुरात आक्रोश सभा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

सोलापूर - केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप कार्यकर्त्यांसह हिंदुत्ववादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांच्या हत्यांचे सत्र सुरूच आहे. 1968 पासून आतापर्यंत सुमारे 232 कार्यकर्त्यांच्या हत्या कम्युनिस्ट विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी केल्या आहेत. या हिंसेच्या विरोधातील "एल्गार'ची ही सुरवात आहे. केरळमधील हिंदुत्त्ववाद्यांच्या हिंसा थांबेपर्यंत संपूर्ण देशभरात हे आंदोलन सुरू राहणार आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भविष्यकाळात यापेक्षाही तीव्र आंदोलन होतील, असा इशारा रा. स्व. संघाचे प्रांत संपर्क मंडळ सदस्य प्रणव पवार यांनी दिला.

हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या होत असलेल्या हत्यांच्या विरोधात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश सभा झाली. या वेळी व्यासपीठावर संघाचे जिल्हा संघचालक शिवाजीराव पाटील, शहर संघचालक राजेंद्र काटवे, रंगनाथ बंग, सोलापूर जनता सहकारी बॅंकेचे अध्यक्ष किशोर देशपांडे आदी उपस्थित होते. भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी म्हणाले, की जगातून कम्युनिस्ट विचारसरणी संपत चालली आहे. मात्र या देशातील कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक मात्र अद्यापही रशियातील कम्युनिस्ट विचारधारेप्रमाणेच काम करतात. भारतीय कम्युनिस्ट कार्यकर्ते हे रशियात पाऊस पडायला लागला की आपल्या देशात छत्री उघडून धरतात, अशी त्यांची विचारसरणी आहे.

Web Title: Hindutvadi organizations Solapur cry meetings