सोलापुरातील हिप्परगा तलाव भरला 60 टक्के

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

- तीन वर्षानंतरची स्थिती
- महापालिकेने थांबविला उपसा

सोलापूर : गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे तसेच उजनी कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गुरुवारी हिप्परगा तलावात सुमारे 60 टक्के साठा झाला आहे. गेल्या तीन वर्षानंतर इतका पाणीसाठा झाला आहे. हे पाणी गुरुत्वाकर्षण (ग्रॅव्हीटी) पद्धतीने भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रात येते.

तलाव कोरडा पडल्यावर कालव्याद्वारे आलेले पाणी वीजेच्या मोटारीलावून उपसा केला गेला. मात्र आता पुरेसा साठा झाल्याने महापालिकेने पाणी उपसा करण्याची यंत्रणा काढून टाकली. शहराला पाणीपुरवठा होणारा औज आणि चिंचपूर बंधाराही "ओव्हरफ्लो' आहे. शहराला उजनी योजनेतून दररोज 80 दशलक्ष लिटर, औज-टाकळी योजनेतून 90 दशलक्ष लिटर आणि हिप्परगा योजनेतून सात दशलक्ष लिटर असे एकूण 170 ते 177 दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जात आहे. 

सोलापूर शहराच्या गावठाण भागाला पाणीपुरवठा होणारा हिप्परगा तलाव तब्बल तीन वर्षांनी भरू लागला आहे. उजनी कालव्याद्वारे सोडण्यात आलेले पाणी आणि पावसामुळे या तलावातील पाणी जवळपास 60 टक्के झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी हा तलाव पूर्णपणे कोरडा पडला होता. उजनी धरण पूर्णपणे भरल्यामुळे कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. हे पाणी हिप्परगा तलावापासून सुमारे 200 ते 300 मीटर अंतरावर असलेल्या जॅकवेलच्यामाध्यमातून भवानी पेठ पाणीपुरवठा केंद्रात आणले गेले. दरम्यान मोहोळ ते कुरूलदरम्यान कालवा फुटल्याने कारंबा कालव्यात येणारे पाणी थांबले. त्यामुळे शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन फिस्कटले होते. 

गेल्या सात ते आठ दिवसांत झालेल्या पावसामुळे तसेच उजनी धरणातून कालव्यात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे हिप्परगा तलावाचे पात्र पाण्याने पूर्णपणे व्यापले आहे. अगदी पहिल्या इंटकवेलपर्यंत पाणी पसरले आहे. त्यामुळे शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. दरम्यान तलावातील गाळ काढला आणि आणखीन पुरेसा पाणीसाठा झाला तर सोलापूरकरांना उजनी योजनेवर अवलंबून रहावे लागणार नाही, असे जलअभ्यासक भक्ती जाधव यांनी सांगितले. 

सर्वांत जुनी योजना 
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकरुख, उजनी आणि टाकळी हे तीन स्रोत आहेत. त्यापैकी सर्वांत जुनी योजना ही एकरुख तलावाची आहे. 1932 पासून या योजनेतून पाणी घेतले जाते. 1932 ते 1946 पर्यंत या केंद्रावर फिल्ट्रेशनची सोय नव्हती. 1946 पासून ती सोय झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hipparga dam in Solapur is 60 percent full