त्यांचं दिवाळीनं काढलं दिवाळं

त्यांचं दिवाळीनं काढलं दिवाळं

नगर : दिवाळ सण मोठा, नाही आनंदाला तोटा... असं दीपावली सणाबाबत म्हटलं जातं. गोडधोड आणि विविध प्रकारच्या खरेदीमुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित होतो. परिणामी विक्रेत्यांच्या जीवनातही आनंद निर्माण करतो. यंदा मात्र अजबच घडलं. वादळी पावसाने शेतकऱ्यांचे पीक धुऊन नेलं. याच दरम्यान मंदीही चोरपावलाने आली. त्यातच दिवाळीच्या तोंडावर आलेल्या पावसाने लोकांना खरेदीसाठी बाहेरच पडता आले नाही. त्यामुळे अनेक विक्रेत्यांचा माल भिजला, तर काही अंगावर पडला. हार, फुले, पणत्या, करगोटाविक्रेत्यांच्या
आनंदावर पावसाने पाणी फेरले. तोटा झाल्याने त्यांनी दिवाळीत होळी साजरी केली.

प्रत्येक घरासमोर तेवणारी दिव्यांची माळ, छतावरील आकाशकंदील, नावीन्यपूर्ण पूजा साहित्य, फटाके, रंगीबेरंगी रांगोळ्या व नवीन कपडे परिधान करून फराळाचा दिवाळीत आस्वाद घेतला जातो. मात्र, यंदा पावसाळ्याच्या उत्तरार्धात वरुणराजाने रुद्रावतार धारण केला. हा पाऊस दिवाळी संपली, तरी ठाण मांडून आहे. याचा परिणाम सामान्य शेतकऱ्यांसह थेट बाजारपेठेवरही झाला.

बाजारात ग्राहकांची खरेदी मंदावली. दिवाळीतच पावसाने जोर धरल्याने पणत्या, मातीचे सुगड व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) लक्ष्मीच्या मूर्ती, सवत्स गाय-वासराच्या मूर्ती, आकर्षक कापडी फुलांच्या माळा, करगोटे आदी साहित्याची खरेदीच झाली नाही. लक्ष्मीमूर्तीचे विक्रेते, तसेच लक्ष्मीपूजनासाठीचे साहित्य विकता आले नाही. पावसामुळे साहित्याची मागणी घटली. त्याचा किमतीवर परिणाम झाला. कमी दरात हे साहित्य विकावे लागले. उर्वरित अंगावर पडले.

दिवसभर रस्त्यावर बसून साहित्यविक्री करायची आणि त्यातून मिळालेल्या पैशावर दिवाळी साजरी करायची असे त्यांचे नियोजन असते. पण पावसाने सर्व गणित बिघडले. या विक्रेत्यांना पोटापुरतेही पैसे मिळाले नाहीत. पावसात साहित्य भिजले, ते नुकसान वेगळेच. स्थानिकांसोबतच परप्रांतीयांनाही याचा फटका बसला. तीन-चार महिने मेहनतीने कलाकारांनी दिवाळीसाठी या वस्तू बनविल्या. पण पावसाने त्यावर पाणी फेरले. परिणामी या हातावर पोट भरणाऱ्यांचे दिवाळीत दिवाळे निघाले.

यंदा दिवाळीचा आनंद पावसाने हिरावून नेला. सुमारे पाच लाख रुपयांपर्यंत आमच्या कुटुंबीयांचे नुकसान झाले आहे. मातीच्या अनेक वस्तू खराब झाल्या. इतरांचीही आमच्यापेक्षा वेगळी स्थिती नाही.
 राकेश कुमार,
आकाशकंदील विक्रेता, बिहार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com