धक्का बसेल.... वांगी झाली दीडशे रुपये किलो 

महादेव अहिर
Wednesday, 21 October 2020

सर्वसाधारणपणे घाऊक बाजारात 300 ते 500 रुपये प्रती दहा किलो असणारी वांगी आज तब्बल 1310 रुपयांच्या घरात पोहचली. वांगी दराच्या इतिहासात ही ऐतिहासिक वाढ मानली जाते. घाऊक बाजारातच 130 रुपयांचा टप्पा प्रती किलोला वांग्याने ओलांडल्यामुळे किरकोळ बाजारात वांगी दीडशे रुपयांहून अधिक दराने विकली जात आहेत. 

वाळवा (सांगली) ः सर्वसाधारणपणे घाऊक बाजारात 300 ते 500 रुपये प्रती दहा किलो असणारी वांगी आज तब्बल 1310 रुपयांच्या घरात पोहचली. वांगी दराच्या इतिहासात ही ऐतिहासिक वाढ मानली जाते. घाऊक बाजारातच 130 रुपयांचा टप्पा प्रती किलोला वांग्याने ओलांडल्यामुळे किरकोळ बाजारात वांगी दीडशे रुपयांहून अधिक दराने विकली जात आहेत. 

त्यामुळे सामान्य माणसांच्या आहारातील महत्वाचे घटक मानले जाणारी वांगी जवळपास गायबच झाली आहेत. तुलनेत उत्पादन घटल्यामुळे बेभरवशी पाऊस मानामुळे वांगी दराने उसळी घेतली आहे. त्या तुलनेत इतर पालेभाज्या प्रती दहा किलोला 400 ते 600 रुपयांच्या घरात स्थीर आहेत. कांद्याने मात्र 7500 रुपये क्विंटल पर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे घरासह हॉटेलमध्ये कांद्याचे अस्तीत्व विरळ झाले आहे. 

सर्वसाधारणपणे वांगी, कोबी, फ्लॉवर, भेंडी, गवारी, पावटा, कार्ले, गाजर, मुळा, ढोबळी मिरची आणि हिरव्या मिरचीचा वापर प्रत्येक ठिकाणी स्वयंपागृहात होतो. त्यात वांग्याला अनन्यसाधारण महत्व आहे. शिवाय त्याचा दरही परवडणारा असल्यामुळे सामान्य कुटुंबाला भाजीसाठी वांग्याचा मोठा आधार राहतो. मात्र हीच वांगी आता प्रती किलोला किरकोळ बाजारात 200 रुपयांकडे वाटचाल करीत आहेत. हिरव्या, काळ्या आणि पारवी रंगाच्या वांग्याच्या जाती या भागात प्रसिध्द आहेत. त्यातही हिरवा काटा आणि तत्सम जातींची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सर्वसाधारण लावणीनंतर आठ ते नऊ महिने वांगी उत्पन्न देतात. साधारणपणे प्रती दहा किलोचा दर 200 पासून जास्तीत जास्त 450 रुपयांच्या घरात खेळता राहतो. गेल्या आठ दिवसात मात्र वांग्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

आवक कमी असल्यामुळे दरातील वाढीची गती काही कमी होत नाही. दोन दिवसापुर्वी घाऊक बाजारात वांगी 700 ते 900 रुपये प्रती दहा किलो मिळत होती. या दोन दिवसात मात्र वांगी दरात कमालीची वाढ झाली आहे. अनेक किरकोळ विक्रेत्यांनी घाऊक बाजारात जाऊनही प्रचंड दरामुळे वांगी खरेदी केली नाहीत. त्यामुळे कधी नव्हे ती वांगी टंचाई निर्माण झाली आहे. वांग्या बरोबरच कांदा दरातही लक्षणीय वाढ झाली आहे. 70 ते 75 रुपये प्रती किलो कांदा किरकोळ बाजारात मिळतो. त्यामुळे एकच कांदा दोन दिवस गृहिणी वापरत आहेत. बहुतेक ठिकाणी हॉटेल मध्ये कांद्याऐवजी इतर घटकांचा वापर वाढला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is a historic increase in the price of eggplant