माढ्यात सापडले "टिपू सुलतान' काळातील ऐतिहासिक नाणे  (video)

किरण चव्हाण 
Saturday, 7 December 2019

माढ्यात टिपू सुलतान यांच्या काळातील ऐतिहासिक नाणे सापडले आहे. यामुळे माढा हे पेशवे, इंग्रज व टिपू सुलतान यांच्यातील संघर्षाचा एक साक्षीदार असल्याचे समोर आले असून, इतिहास संशोधक मयूर चव्हाण यांनी केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. 

माढा (सोलापूर) : माढ्यात टिपू सुलतान यांच्या काळातील ऐतिहासिक नाणे सापडले आहे. यामुळे माढा हे पेशवे, इंग्रज व टिपू सुलतान यांच्यातील संघर्षाचा एक साक्षीदार असल्याचे समोर आले असून, इतिहास संशोधक मयूर चव्हाण यांनी केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. 
येथील चवरेवस्ती - चिंचोली रस्ता येथे राहात असलेल्या विक्रांत सयाजी चवरे यांना दोन वर्षांपूर्वी त्यांच्या घराजवळील शेतात काम करताना मातीत एक नाणे सापडले होते. ते त्यांनी बरेच दिवस जपून ठेवले व त्यांचे मित्र दीपक चव्हाण व विजय ठोंबरे यांच्यामार्फत हे नाणे माढ्यातील इतिहास अभ्यासक मयूर चव्हाण यांच्या हाती आले. चव्हाण यांच्या शोधाअंती माढ्याचा सुमारे 240 ते 250 वर्षांचा अनोल्लेखित जाज्वल्य व अप्रकाशित इतिहास आता उजेडात आला आहे. 

हेही वाचा : भाजपच्या बैठकीला एकनाथ खडसेच गैरहजर; पहा काय घडले! 
इतिहास संशोधक मयूर चव्हाण यांच्या मते 

चवरे यांना सापडलेले हे नाणे 10 ग्रॅमचे पूर्णपणे भरीव गोलाकार, चपटे व तांब्याचे आहे. यावर पुढच्या बाजूला डावीकडे मुख असलेल्या, सोंड जमिनीकडे केलेल्या व शेपटीवर उचलून "तसलीम' (सलामी) देणाऱ्या हत्तीचे चित्र आहे. दुहेरी वर्तुळाकार रेघांमध्ये बारीक ठिपके आहेत. मागच्या बाजूला उर्दूमधून "पट्टन' ही अक्षरे कोरली आहेत, जी हे नाणे टिपू सुलतान यांच्या काळातील असून टिपू सुलतानची राजधानी श्रीरंगपट्टण येथे हिजरी सन 1197 ते हिजरी सन 1203 अर्थात इ. स. 1782 ते 1787 दरम्यान तयार केल्याचे निर्देशित करतात. टिपू सुलतानच्या अहमदी, सद्दीकी, फर्रूख, हैदरी, अबीदी, जफरी, मुश्‍तारी आदी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या नाण्यांपैकी माढ्यात सापडलेल्या नाण्याला तेव्हा "बहरम' (अर्धा पैसा) म्हटले जायचे. या नाण्यावर इस्लामी मौलुदी वर्ष व सनावळी लिहिलेल्या आढळतात. 

हेही वाचा : अवघडचंय! कामाचा व्याप 383 गावांचा अन्‌ कर्मचारी फक्त 21 
माढ्यातील ऐतिहासिक किल्लेवजा गढीत मुक्कामास

महाराष्ट्रासह दक्षिण भारतावर कब्जा करू पाहणाऱ्या इंग्रजांविरुद्ध इ. स. 1779 मध्ये पेशव्यांकडून नाना फडणवीसांनी हैदराबादचा निजाम असफजहा व म्हैसूरचा सुलतान हैदरअली यांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध कडवी झुंज दिली होती. या कालखंडाला "म्हैसूरची युद्धे' म्हटले जाते. "म्हैसूरचे दुसरे युद्ध' हे सप्टेंबर 1782 पर्यंत चालले व त्यामधे इंग्रजांचा प्रथमतः पराभव झाला होता. या युद्धावर जाण्यापूर्वी स्वराज्याच्या फौजा व सातारकर छत्रपतींचे तथा पेशव्यांचे कारभारी श्रीमंत कृष्णराव बल्लाळ, अमृतराव पेठे तसेच इतर छत्रपती व पेशवे दरबारातील मातब्बर मुत्सद्दी मानकरी मंडळी 6 सप्टेंबर 1781 मध्ये माढ्यातील ऐतिहासिक किल्लेवजा गढीत मुक्कामास होते. माढ्यातील माढेश्‍वरी मंदिर, विठ्ठल मंदिर आदी तत्कालीन ख्यातनाम मंदिरांचे दर्शन घेऊन जेवणानंतर ही मंडळी फौजेसह पुढे 12 सप्टेंबर 1781 ला माढ्यातील निंबाळकरांच्या परंडा हवेली (ता. भूम, जि. उस्मानाबाद) येथील राजवाड्यात जेवणाची राजेशाही मेजवानी व मानाचे विडे, पानदान करून तुळजापूरमार्गे कर्नाटककडे पोच झाले. तेव्हा माढा जहागीरचा कारभार, माढेधिपती श्रीमंत राजारावरंभाजी राजेनिंबाळकर यांचे नातू श्रीमंत राजे भगवंतराव हे सांभाळत होते. सन 1780 ते 1782 पर्यंत झालेल्या या युद्धानंतरच हैदरअलीचा मृत्यू झाला व त्यांचा मुलगा शाहबहादूर फत्तेअलीखान ऊर्फ टिपू सुलतान गादीवर आल्यानंतर त्यांनी हा संघर्ष पुढे चालूच ठेवला. 

हेही वाचा : आता "या' गावात केली जातेय कांद्याचीही राखण 
मराठा साम्राज्यासोबत तह 
त्यांनी गादीवर येताच आपल्या नावाची चलने व नाणी छापून घेतली. त्यांच्या कारकिर्दीत दक्षिण भारतात नाणी तयार करण्याची 12 टांकसाळे श्रीरंगपट्टण, गुंटूर, धारवाड, बंगळूर, मंगलोर, डिंडीगुल, मद्रास, गुर्रमकुंडा, कालीकत, सत्यमंगलम, पुदुच्चेरी (पॉंडीचेरी) आदी ठिकाणी उभा केली होती. युद्धातील तह करार न पाळल्याने व 1784 मधील पेशव्यांच्या अटींना तिलांजली दिल्याने माधवराव पेशव्यांनी टिपू सुलतानविरुद्ध निजाम व इंग्रज यांना एकत्र करून टिपू विरुद्ध आघाडी उघडली. त्यात माढ्याचे पहिले राजे व रावरंभा घराण्याचे मूळपुरुष राजेरावरंभाजी यांचा पराक्रमी मुलगा "राजे रावरंभाजानोजी जसवंतराव अर्जुनबहाद्दर' (हे जानोजींच्या नावापुढील किताब होते) यांचे द्वितीय पुत्र "राजेमाहाराव' हे सुद्धा निजामाकडून व पेशव्यांकडून आपल्या सैन्यासह युद्धात हजर होते. पुढे 1786 मध्ये इतिहासप्रसिद्ध "गजेंद्रगडचे युद्ध' होऊन त्यात टिपू सुलतानचे बहुतांश सैन्य मारले जाऊन टिपू सुलतानचा निर्णायक पराभव झाला व 1787 मध्ये त्यांनी मराठा साम्राज्यासोबत तह केला. 

हेही वाचा : परीक्षेआधीच निकाल 
5000 मानधन 
पेशव्यांनी त्यांच्याकडून 47 लाख रुपये युद्धखंडणी व वार्षिक 12 लाखांची खंडणी, हैदरअलीकडील पहिली उर्वरित रक्कम रोख देण्याचे ठरले. त्या वेळीच टिपू सुलतान यांनी भरलेल्या काही रकमेपैकी सोने, चांदीची तथा तांब्याची नाणी व चलने पेशव्यांच्या कोषागारात आली व त्याच काळात माढ्यातील श्रीमंत राजेभगवंतराव राजेनिंबाळकर हे सन 1781 ते 1790 पर्यंत राजेमाहाराव निंबाळकरांच्या सल्ल्याने पेशवे दरबारी राहून महिना 5000 मानधन घेऊन माढा जहागीर सांभाळून होते. याच काळात टिपू सुलतानची ही चलने पेशव्यांकडून व राजेभगवंतरावांचे पेशव्यांकडील निकटवर्तीय श्रीमंत कृष्णराव बल्लाळांकडून हस्तांतरित होऊन राजे भगवंतरावांकडे आली असल्याने "बहरम' (अर्धापैसा) हे टिपू सुलतानाचे तांब्याचे नाणे माढ्यात सापडले.

Image may contain: 1 person, beard and close-up

दक्षिण भारताचा पेशवेकालीन इतिहास
श्रीरंगपट्टणपासून सुमारे 750 किमी असलेल्या माढ्यात हे नाणे सापडल्याने विविध ऐतिहासिक व अस्सल साधनांतून संशोधन करून या नाण्याचा पट्टण ते माढा प्रवासाचा व त्यात दडलेला माढ्याचा अप्रकाशित इतिहास शोधून काढला. महाराष्ट्राचा व समग्र दक्षिण भारताचा पेशवेकालीन इतिहास आता माढ्याशिवाय पूर्ण होणार नाही, असे संशोधनातून मला वाटते. 
- मयूर चव्हाण, इतिहास संशोधक, माढा 
 

Image may contain: 1 person

मोठा इतिहास
या नाण्यामागे काही तरी ऐतिहासिक गोष्टी असणार म्हणून मी ते जपून ठेवले. पण त्याच्यामागे एवढा मोठा इतिहास असेल, असे मला वाटले नव्हते. 
- विक्रांत चवरे, माढा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Historical coins of Tipusultan found in Madha