होळीपाठोपाठ धूलिवंदनाची तयारी

Meat-Rate
Meat-Rate

सातारा - अनेक ठिकाणी बोकडाच्या मटणाने ५०० रुपयांचा टप्पा ओलांडला. अंडीही महागली. तरी आजही मटणाच्या दुकानांपुढील रांगा वाढतच असून, या पार्श्‍वभूमीवर होळीपाठोपाठ येणाऱ्या धूलिवंदनाची तयारी मोठ्या ‘जोशात’ आहे. मात्र, धूलिवंदन प्रभू दत्तात्रेयांच्या वारादिवशी (गुरुवार) असल्यामुळे काही अशी अंडी-मटणाच्या उलाढालीवर परिणाम होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, देशी-विदेशीवर कितीही नियंत्रणे असली तरी गावागावांत पानटपऱ्यांवरही ‘टॅंगो’ सहज उपलब्ध होत आहे. धुळवडीला याचीही उलाढाल वाढणार आहे.

होळीपाठोपाठ गुरुवारी धूलिवंदन साजरे होणार आहे. तरुणांनी धूलिवंदन ‘सेलिब्रेट’ करण्यासाठी शहराबाहेर जाण्याचे बेत आखलेले आहेत. पॉवर हाउस, सांबरवाडी, यवतेश्‍वर पठार, कास पठार, कास तलाव, ठोसेघर आदी ठिकाणे सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध आहेत. दरम्यान, बोकडाच्या मटणाच्या दरात गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ झाली आहे. धुळवडीव्यतिरिक्त इतर दिवशीही मटणाला असलेली मागणी, बकऱ्यांच्या वाढलेल्या दरामुळे ही वाढ सतत होत आहे.

शहर व परिसरात सध्या ४८० ते ५२० रुपये किलो हा दर आहे. इतर दिवसांपेक्षा शनिवार, सोमवार आणि गुरुवारी मटणाला मागणी काही प्रमाणात कमी असते. अनेकजण गुरुवारी मटण खाणे टाळतात. तथापि, गुरुवारी धूलिवंदन येत असल्याने मागणीवर काही प्रमाणात परिणाम होईल, असे मत विक्रेत्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, धूलिवंदन म्हटले की अनेक ‘हौशी’ लोकांना दारूशिवाय हा सण साजरा केल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे मद्याची उलाढाल निश्‍चितच वाढणार आहे.

आलेल्या दिवशीच धूलिवंदन! 
आपली श्रद्धा असलेल्या दैवताचा वार पाळणारी मंडळी शक्‍यतो दुसऱ्या दिवशी धूलिवंदन करतात. मात्र, धूलिवंदनाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तुकाराम बीज आहे. तर लगेच महाबली हनुमानाचा वार शनिवार अन्‌ रविवारी संकष्टी चतुर्थी आहे. यामुळे बहुतेकजण आलेल्या दिवशीच धूलिवंदन साजरे करतील, असे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान, बेकायदा मद्यविक्रीला बंदी असली तरी गावागावांत अगदी पानपट्टयांवरही गुपचुप देशी दारूची विक्री राजरोस सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com