भटक्यांच्या पंढरीत पेटली होळी

Holi festival starts at Kanifnath fort
Holi festival starts at Kanifnath fort

पाथर्डीः नवनाथांपैकी एक असलेल्या कानिफनाथांनी संजीवन समाधी घेतलेल्या तालुक्‍यातील मढी येथील कानिफनाथ गडावर सोमवारी रात्री मढी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी होळीचा (भट्टीचा) सण साजरा केला.

होळी सणाच्या पंधरा दिवस आधी होळीचा सण साजरा करणारे मढी हे देशातील एकमेव गाव आहे. हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी गावातील होळी पेटविण्याचा मान गोपाळ समाजाचा असून, या दिवशी मढी ग्रामस्थ होळीचा सण साजरा करत नाहीत.


सार्वजनिक होळी पेटल्यानंतर मढीयात्रेला सुरवात झाल्याचे मानले जाते. मढी येथील होळीच्या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा असून, कानिफनाथांनी संजीवन समाधी घेण्याच्या 15 दिवस आधीच येथील भट्टीचा सण ग्रामस्थ एकत्रितरीत्या साजरा करतात.

भटक्‍या व दुर्बल घटकांतील नागरिकांना विशेष मान दिला जातो. ही होळी झाल्यानंतर पंचमीला नाथांच्या समाधीला तेल लावण्याचा विधी केला जातो. हा विधी झाल्यानंतर ग्रामस्थ शेतीतील कामे बंद करतात. पलंग व गादीवर कोणीही बसत नाही, दाढी-कटिंग केली जात नाही, तळलेले व गोड पदार्थ खाणे बंद केले जाते. 

गोवऱ्या आणल्या
होळी पेटविण्यापूर्वी सोमवारी रात्री ग्रामस्थांनी मुख्य गडावर, हाताने बनविलेल्या शेणाच्या गोवऱ्या आणल्या. कानिफनाथांची आरती करण्यात आली.

मढी देवस्थानाचे अध्यक्ष शिवशंकर राजळे, विश्वस्त आप्पासाहेब मरकड, बाबासाहेब मरकड, बाबा कुटे, भगवान मरकड, विष्णू मरकड, सरपंच रखमाबाई मरकड, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार यांच्या उपस्थितीत पूजा करून होळी पेटविण्यात आली.

या वेळी मोठ्या संख्येने नाथभक्त उपस्थित होते. कानिफनाथांचा जयघोष भाविकांनी या वेळी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com