"होम डेकोर'चं थांबलं, मग ती "सुगरण' झाली 

अजित झळके
Friday, 24 July 2020

कोरोनाचे संकट मोठे आहेच, मात्र त्याने मोडून चालणार नाही. जगण्यासाठी नवनवे मार्ग शोधावे लागतील. त्यासाठी "सकाळ'ने पुढाकार घेतला आणि अशा नवा मार्ग शोधणाऱ्यांना वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न सुरु केला. अशा काही धडपड्या लोकांची ओळख यानिमित्ताने व्हावी आणि या लढाईला बळ मिळावे, हाच त्यामागचा उद्देश. 

सांगली ः गेली काही वर्षे मी गृहसजावटीचं करतेय. पडदे बनवणे, सोफे बनवणे, वॉल पोस्टर्स लावणे आदी व्याप वाढला होता. नवनवे ग्राहक येत होते. हे सारं काम एका क्षणात थांबले. महापुराने नुकसान झालंच होतं, कोरोनाने आशांवरही पाणी फेरले. बसून काय करणार? कर्जाचे हप्ते, घरखर्च सारा व्याप मोठा. या आपत्तीत स्वतःतील सुगरणपणाला मी वाव द्यायचं ठरवलं. ऑनलाईन खाद्यपदार्थ विक्री सुरु केली. प्रतिसाद मिळाला. आता मला छोटेसे कॅन्टिन सुरु करायचं आहे, लवकर कोरोना जावो, याची वाट पाहतेय.... माधुरी वसगडेकर सांगत होत्या. 

पती निरज वसगडेकर यांच्या मदतीने मी नव्या व्यवसायात उतरले. सांगलीतील पत्रकारनगरमध्ये आम्ही राहतो. राजस्थानी, गुजराती, महाराष्ट्रीय, पंजाबी पदार्थ बनवण्याची मला आवड आहे. घरातूनच ही कला आली. फेसबूकवर पदार्थांचे फोटो टाकून नव्या व्यवसायाची माहिती दिली. उदंड प्रतिसाद मिळाला.

पावभाजी, वडापावमधील किंग वडा, बटर वडा, डबल चीज वडा, पकोडे, चकली, कांदा भजी, बटाटे भजी, मिरची भजी, उकडीचे मोदक, मुगाचे घावण, बिर्याणी, चिकन, मटण, राजस्थानी चिवडा, राजस्थानी डाळ-बाटी, सुरमा, गट्टाची भाजी विकली. हुलग्याचं माडगं, चकल्या, मूगडाळीचा शिरा, बैलपोळ्या दिवशी कटाची आमटी आणि पुरण पोळी विकली. उपवासाचे पदार्थ विकले. सुगरण घरात जन्म झाल्याचा फायदा झाला. ऑर्डर मोठी असेल तर घरपोच करतो. होम डेकोरसाठी नवी कामे कमीच राहणार आहेत, ती सुरूच आहेत. त्यामुळे कॅंटीन सुरु करून नव्या व्यवसायाला विस्तारीत रुप द्यायचा इरादा आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Home Decor" stopped, then it became "Sugaran"