(video) मुंबई-ठाण्याच्या ग्राहकांना भाजीपाला घरपोच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 एप्रिल 2020

प्रवरा फळे-भाजीपाला प्रक्रिया संस्थेच्या माध्यमातून भाजीपाला संकलित करून पॅकेजिंग केला जातो. खरेदीनंतर आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर पैसे जमा होतात. त्यामुळे विक्रीसाठी अडचणी येत नाही. माल बाजारभावात विकला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्राहकांचेही समाधान होत आहे. 

श्रीरामपूर : मुंबई-पुण्यात कोरोनाने कहर केला असताना, तेथील सर्वसामान्य ग्राहकांना भाजीपाल्याच्या खरेदीसाठी बाहेर पडणेही धोकादायक वाटू लागले आहे. अशा स्थितीत मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत थेट ग्राहकांपर्यंत भाजीपाला आणि शेतमाल पोच करण्याचा उपक्रम प्रभात डेअरीने सुरू केला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन "किसान कनेक्‍ट फार्मर कंपनी'तर्फे हा शेतमाल उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी नेरूळ (नवी मुंबई) परिसरात कार्यालय सुरू करून ग्राहकांची नोंदणी केली आहे.

कंपनीने शेतकरी व ग्राहकांमध्ये दुवा साधण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीने महिन्यापूर्वी मुंबई व ठाणे उपनगरातील ग्राहकांचे सर्वेक्षण करून गरजा जाणून घेतल्या. स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतमालाचा आढावा घेऊन माहिती संकलित केली. त्याचा फायदा आज होत आहे. "प्रभात'ने आजवर दूधव्यवसायाला नवी दिशा दिली. आता शेतमाल व्यवसायात पाऊल टाकले आहे. त्यानुसार शेतमाल शहरी ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी ही योजना आखली. नगर, नाशिक व पुणे जिल्ह्यांत कंपनीची सुरवात होत आहे.

प्रवरा फळे-भाजीपाला प्रक्रिया संस्थेच्या माध्यमातून भाजीपाला संकलित करून पॅकेजिंग केला जातो. खरेदीनंतर आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर पैसे जमा होतात. त्यामुळे विक्रीसाठी अडचणी येत नाही. माल बाजारभावात विकला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्राहकांचेही समाधान होत आहे. 

prabhat

श्रीरामपूर : "प्रभात'तर्फे भाजीपाला पाठविण्यापूर्वी त्याची निवड आणि पॅकेजिंग करताना कर्मचारी. 

शहरी ग्राहकांना सध्या घरपोच भाजीपाला मिळत आहे. बाजारमूल्यानुसार दर असल्याने कंपनीला पसंती मिळाली आहे. पुढे "किसान कनेक्‍ट'मार्फत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन "करार पद्धतीने शेती' कल्पना राबविली जाणार आहे. शेतकऱ्यांना चांगला मोबदला देऊन रास्त किमतीत चांगला शेतमाल ग्राहकांपर्यंत पोचविणे, हा कंपनीचा उद्देश असल्याचे संस्थापक सारंगधर निर्मळ यांनी सांगितले. 

कंपनीच्या माध्यमातून शिक्षित व बेरोजगार तरुणांना शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न असल्याचे सीईओ विवेक निर्मळ यांनी सांगितले. आतापर्यंत श्रीरामपूर व मुंबई येथील 100 जणांना त्यात रोजगार मिळाला आहे. पुढे शेकडो बेरोजगारांना कामाची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे संचालक किशोर निर्मळ यांनी सांगितले. आंबेगाव (जि. पुणे) येथील थोरांदळे येथील केंद्रावर शेतमाल खरेदी करून तेथून नवी मुंबईतील ग्राहकांपर्यंत तो पुरविला जात आहे. लवकरच निफाड येथे फळे व भाजीपाला संकलन केंद्र सुरू होत आहे.

लॉकडाउननंतर कंपनीचे कार्य मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे निधी निर्मळ यांनी सांगितले. शेतमालाची नोंद करण्यासाठी 9146464752 या क्रमांकावर शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन "प्रभात'तर्फे करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: home delivery of vegetables to Mumbai-Thane customers