जिल्ह्यातील पोलिसांसाठी 1400 निवासस्थाने 

chandrakant-patil
chandrakant-patil

कोल्हापूर - पोलिसांच्या निवासस्थानांची अवस्था सुधारण्यासाठी राज्यात नवीन 29 हजार निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात 1400 निवासस्थानाचा समावेश आहे. निवासस्थाने पूर्ण होईपर्यंत शौचालये, सांडपाणी, पाणी, रंगरंगोटी अशा सुविधा त्वरित उपलब्ध करून दिल्या जातील, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जाहीर केले.

पोलिसांना ही दिवाळी भेट नव्हे, तर तो त्यांचा हक्क आहे. यापूर्वीच त्याची दखल पूर्वीच्या सरकारने घ्यायला हवी होती, अशी खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली. पोलिस मुख्यालयातील निवासस्थानांची पाहणी केल्यानंतर कोल्हापूर पोलिस दलाने घेतलेल्या स्वागत समारंभात ते बोलत होते. 

श्री. पाटील म्हणाले, ""पोलिसांच्या निवासस्थानाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात नुकताच आढावा घेतला. प्रत्येक पालकमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यातील पोलिस वसाहतीमध्ये जाऊन त्यांची स्थिती मांडावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार आज मी त्याचा आढावा घेतला. सध्या मुख्यालयात 718 घरे असून त्यामध्ये शाहूकालीन 518 व 1986 मध्ये बांधण्यात आलेल्या 200 घरांचा समावेश आहे. लक्ष्मीपुरी पोलिस लाईनमध्ये 60, रिसाला पोलिस लाईन 84 अशी 913 निवासस्थाने आहेत. राज्य पोलिस गृहनिर्माण कल्याण महामंडळातर्फे 1139 निवासस्थानांना मंजुरी प्राप्त आहे. पहिल्या टप्प्यात जुना बुधवार, पोलिस लाईन येथे 200 निवासस्थाने बांधण्यात येतील. जुनी निवासस्थाने पाडून तेथे नवीन बहुमजली इमारती बांधण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. इचलकरंजी कलानगर येथील पोलिस खात्याच्या रिकाम्या जोगवर 242 निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. रंगरंगोटी, स्वच्छतागृहे, पाणी, सांडपाणी आदी डागडुजीसाठी पाच कोटींचा निधी तत्काळ मंजूर करण्यात आला आहे. येत्या तीन वर्षांत पोलिस कर्मचाऱ्यांना हॉल, किचन, बेडरूमसह स्वच्छतागृह असलेली अद्ययावत घरे उपलब्ध होतील.'' 

पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे म्हणाले, ""पोलिसांकडून जनतेच्या आणि प्रशासनाच्या अपेक्षा वाढत आहेत. त्यांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पोलिसांना आता 180 चौरस फुटांची निवासस्थाने आता 430 चौरस फुटांची होणार आहेत.'' पोलिसांच्या दृष्टीने ही बाब अत्यंत आनंददायी आहे. याप्रसंगी पोलिस कर्मचाऱ्यांना पालकमंत्री पाटील यांनी दिवाळी भेट दिली. या वेळी नगरसेविका स्वाती यवलुजे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, उपअधीक्षक बी. एम. आंगले, सहायक अभियंता डी. आर. भोसले, शहर पोलिस उपअधीक्षक प्रदीप देशपांडे आदी उपस्थित होते. गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. 

पोलिसांसाठी राज्यात 29,000 घरे 
कोल्हापूर जिल्हात 1,400 घरे 
29 कोटींचा निधी मंजूर 
डागडुजीसाठी 5 कोटींचा निधी 

पालकमंत्र्यांनी केली पोलिस वसाहतीची पाहणी 
पालकमंत्र्यांनी आज पोलिस वसाहतीची पाहणी केली. घरात जागा नाही म्हणून गृहोपयोगी वस्तूचे साहित्य सोप्यातच कसेबसे ठेवले आहे. अवघ्या दोनच खोल्यांत जेमतेम चार-पाच व्यक्तींचे कुटुंब दिवाळी सणात अडीअडचणीत कसाबसा आनंद साजरा करते हे पाहून पालकमंत्री चंद्रकांत पाटील अवाक्‌ झाले. पालकमंत्री पोलिस वसाहतीला भेट देण्यासाठी येणार हे समजल्यावर पोलिस दलातील कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. प्रत्येक कुटुंबाने त्यांच्या स्वागतासाठी दारात रांगोळी घातली होती. प्रत्येक जण त्यांची दारात उभे राहून वाट पाहत होता. सकाळी दहाच्या सुमारास पोलिस मुख्यालयातील वसाहतीमध्ये पालकमंत्री पाटील यांचे आगमन झाले. पोलिस बॅंडने त्यांचे स्वागत केले. विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे, कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील यांनी त्यांच्या समोर आराखडा मांडला. पोलिस कुटुंबाच्या समस्या पालकमंत्री पाटील यांनी जाणून घेतल्या. तेथील साडंपाणी, शौचालयाची अवस्था, रंगरंगोटीचा अभाव, गळके छप्पर, घरावर लावलेले मेणकागदाची दखल घेऊन त्यांची दुखणी समजून घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com