घरपोच लायसन्स ‘ब्रेक’के बाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

केंद्र शासनाच्या सारथी योजनेतून ऑनलाइन वाहन परवाना राज्यात पहिल्यांदा कोल्हापुरात सुरू झाला. त्याचा सर्व्हर हैदराबादमध्ये आहे. तांत्रिक बिघाडामुळे डिसेंबरपासून साडेचारशे परवाने प्रलंबित होते. यातील बहुतांशी परवानांची माहिती घेऊन ते पूर्ण केले आहेत. लवकरच संबंधितांना त्यांच्या घरी मिळतील. नवीन योजना चांगली आहे. सुरळीत होण्यासाठी काही कालावधी जाईल. 

- लक्ष्मण दराडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

कोल्हापूर - वाहन परवाना (लायसन्स) घरपोच देण्याची सुविधा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तीन वर्षांपूर्वी सुरू केली. पुन्हा पुन्हा हेलपाटे नको म्हणून सुरवातीला ती स्वागतार्ह ठरली. मात्र आता दोन महिने उलटले तरीही ते घरपोच मिळत नाही. 

वारंवार विचारणा करूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे वाहनधारकांसाठी स्वागतार्ह असलेली योजना आता डोकेदुखी ठरत आहे. घरपोच लायसन्स हा उपक्रम तातडीने बंद करावा, अन्यथा तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी वाहनधारकांतून पुढे येत आहे.

वाहनधारकांना वारंवार प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) हेलपाटे मारावे लागू नयेत, परवानाधारकाने दिलेला पत्ता योग्य आहे की नाही हे पाहता येईल, अशा दुहेरी हेतूने वाहन परवाना घरपोच देण्याची व्यवस्था राज्यभर सुरू केली. कोल्हापुरात या उपक्रमाचे स्वागत झाले. 

स्पीड पोस्टद्वारे अवघ्या दहा दिवसांत परवाना घरपोच मिळत होता. मात्र डिसेंबरनंतर दीड-दोन महिन्यानंतरही परवाना घरपोच मिळत नाही, अशी स्थिती आहे. काही परवानाधारकांनी याबाबत वारंवार विचारणा केल्यावरही लवकरच मिळेल, असे सांगितले जाते. तरीही परवाना घरपोच मिळत नाही. प्रत्यक्षात जाऊन वारंवार हेलपाटे मारूनही परवाना मिळत नसल्यामुळे परवानाधारकांना हा उपक्रम आता डोकेदुखी ठरत आहे. 

स्वागतार्ह असलेला हा उपक्रम कधी सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडातून, कधी पोस्टाच्या दिरंगाईतून डोकेदुखी ठरत आहे. यावर तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा हा उपक्रमच बंद करावा, अशी मागणी परवानाधारकांकडून, वाहनधारकांकडून होत आहे.

Web Title: Home license 'after brek

टॅग्स