घरांच्या किमती भिडणार गगनाला!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मार्च 2019

सातारा - बांधकाम व्यवसायात सातत्याने चढ-उतार होत असल्याने हे क्षेत्र खडतर परिस्थितीतून पुढे निघाले आहे. अशातच आता सिमेंट, स्टिलच्या दरात वेगाने वाढ झाल्याने घरांच्या किमती गगनाला भिडण्याची शक्‍यता आहे. शिवाय, बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना महागडे सिमेंट गोत्यात आणणार आहे. 

सातारा - बांधकाम व्यवसायात सातत्याने चढ-उतार होत असल्याने हे क्षेत्र खडतर परिस्थितीतून पुढे निघाले आहे. अशातच आता सिमेंट, स्टिलच्या दरात वेगाने वाढ झाल्याने घरांच्या किमती गगनाला भिडण्याची शक्‍यता आहे. शिवाय, बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना महागडे सिमेंट गोत्यात आणणार आहे. 

बांधकामासाठी सिमेंट, स्टिल हे दोन घटक अत्यंत आवश्‍यक असतात. त्यातच, या दोन्ही घटकांचा दर नेहमीच अस्थिर असतो. देशातील प्रमुख सिमेंट उत्पादक हे दक्षिण भारतातील आहेत. दक्षिणेतील उत्पादकांनी किंमत वाढविण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा परिणाम देशातील बाजारपेठांवर होतो. बिर्ला, अल्ट्राटेक, कोरोमंडल, एसीसी, बिर्ला एक वन, अंबुजा आदी प्रमुख कंपन्यांची ही मक्‍तेदारी होऊन बसली आहे. त्यामुळे या कंपन्या ठरवतील, त्यानुसार दरांची चढ-उतार होत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांत बोलले जाते. 

जानेवारीअखेरीस घाऊक दरानुसार सिमेंटरचे पोते २३५ रुपयांना मिळत होते. फेब्रुवारीमध्ये ते २९० रुपयांवर गेले होते. आता, तर चक्‍क ३३० ते ३३५ रुपयांच्या घरात गेल्याचे व्यासायिकांनी सांगितले. स्टिलच्या किमतीत किलोमागे दोन ते तीन रुपयांची वाढ झाल्यामुळे ४४ वरून ४६ ते ४७ रुपयांवर स्टिलचे दर पोचले आहेत.

शिवाय, सिमेंटचे दर अजून २५ रुपयांनी वाढण्याची भीती बाजारपेठेत व्यक्‍त केली जात आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. 
सिमेंटचे भाव गगनाला भिडू लागल्याने मर्यादित किमतीत कमी दरात घर घेऊ पाहणाऱ्यांची, तसेच घराचे स्वप्न पाहणाऱ्या सामान्य नागरिकांचे ‘बजेट’ यामुळे कोलमडणार आहे. बांधकामाशी निगडित साहित्याचे दर वाढल्याने घरांच्या किमतीही आणखी वाढल्या जाणार आहेत. सिमेंटवर २८ टक्‍के जीएसटी असल्याने आधीच ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे, त्यात ही दरवाढ ग्राहकांना जेरीस आणणारी ठरणारी आहे. शासनाने यावर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक आहे.

व्यावसायिक अडचणीत
सिमेंटचे दर वाढण्यापूर्वी बांधकाम व्यावसायिक, ठेकेदारांनी कंत्राट घेतलेली आहेत. ती जुन्या दरानुसार घेतली असल्यामुळे वाढलेल्या सिमेंट, स्टिलच्या दरात बांधकाम करणे अडचणीचे ठरणारे आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकही अडचणीत येणार आहेत.

सिमेंटचे दर दोन महिन्यांत १०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. जानेवारीअखेरीस २३५ रुपयांना मिळणारे सिमेंटचे पोते आता ३३५ रुपयांवर पोचले आहे. यामुळे बांधकाम व्यावसायिक, तसेच ज्यांचे बांधकाम करायचे आहे, असे ग्राहक तोट्यात येणार आहेत. या दरांवर नियंत्रण ठेवणे आवश्‍यक आहे.
- राजेश देशमुख, बांधकाम व्यावसायिक, सातारा

Web Title: Home rate Increase