साताऱ्यात उद्यापासून होमगार्डची भरती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

युवकांसाठी चांगली संधी
आतापर्यंत सुमारे तीन हजार ऑनलाइन अर्ज नोंदणी झाली आहे. ती साडेतीन हजारांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. प्रत्येक दिवसाला ७०० रुपयांपर्यंत मिळू शकतात. युवकांसाठी ही एक चांगली संधी आहे. सर्वांनी त्यासाठी नोंदणीत सहभाग नोंदवावा, असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी केले आहे.

सातारा - होमगार्ड सदस्य नोंदणीसाठी पोलिस कवायत मैदानावरील तयारी अंतिम टप्यात आली आहे. गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत ६७६ जागांसाठी शारीरिक क्षमता चाचणीच्या आधारे ही नोंदणी होणार आहे.

गृहरक्षक दलाची पोलिसांना जादा कामाच्या वेळी वेळोवेळी मदत होत असते. गणेशोत्सव, दुर्गोत्सव, यात्रा बंदोबस्त, निवडणुका याबरोबरच वाहतूक नियमनासाठी अनेक ठिकाणी गृहरक्षक दलाच्या सदस्यांची मदत घेतली जाते.

पोलिसांच्या कमी संख्याबळामुळे या दलाचा नेहमीच पोलिसांना हातभार असतो. जिल्ह्यामधील वाढती गरज लक्षता घेता मोठ्या प्रमाणावर गृहरक्षक दलाच्या सदस्यांची नोंदणी होणार आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी दहावी उत्तीर्ण असलेल्या ५० वर्षे वयापर्यंतच्या कोणालाही ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचबरोबर ऑफलाइन पद्धतीने नोंदणीच्या ठिकाणीही अर्ज स्वीकारण्याची सोय उपलब्ध असणार आहे. 

शारीरिक मोजमापे व शारीरिक क्षमतेच्या चाचणीच्या आधारे ही भरती होणार आहे. त्यामध्ये महिला व पुरुष दोन्ही सदस्यांची नोंदणी केली जाणार आहे. पुरुषांना १६०० मीटर, तर महिलांना ८०० मीटर अंतर धावण्याची त्याचबरोबर गोळाफेकीची शारीरिक क्षमता चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे.

उमेदवाराला प्रत्येक शारीरिक क्षमता चाचणी प्रकारात किमान ४० टक्के गुण मिळवावे लागणार आहेत. त्याप्रमाणे एका चाचणीत अपात्र झालेल्या उमेदवाराच्या पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत. 

गुरुवार (ता. २०) व शुक्रवार (ता. २१) या दोन दिवसांमध्ये पोलिस कवायत मैदानावर या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. गुरुवारी सकाळी सहा वाजता इच्छुक उमेदवारांनी पोलिस कवायत मैदानावर उपस्थित राहायचे आहे.

सुरवातीला कागदपत्रांची पडताळणी व शारीरिक मोजमापे घेतली जाणार आहेत. त्यामध्ये पात्र असलेल्या उमेदवारांचीच शारीरिक क्षमता चाचणी दोन दिवसांत घेतली जाणार आहे. त्यासाठी पोलिस कवायत मैदानावर पोलिसांनी तयारी केली आहे. मैदाने आखण्यात आली आहेत. पावसाची शक्‍यता गृहीत धरण्यात आली आहे. त्यानुसार पावसामुळे मैदान निसरडे झाल्यास अन्य ठिकाणी धावण्याची स्पर्धा घेण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Homeguard Recruitment in Satara