सांगली, मिरजेत मेडिकल टुरिझमचा प्रयत्न व्हावा - डॉ. दीपक म्हैसेकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

'सकाळ' माध्यम समूहाच्या वतीने आज डॉक्‍टर्स डेच्या निमित्ताने जिल्ह्यातील मान्यवर डॉक्‍टरांचा सन्मान करण्यात आला.

सांगली - सांगली, मिरजेतील वैद्यकीय सेवा देशातील सर्वात स्वस्त
आणि उत्कृष्ट आहे. त्यामुळे या परिसरात मेडिकल टुरिझम करता येईल
त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत असे मत पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक
म्हैसेकर यांनी आज व्यक्त केले. 'सकाळ' समूहाने डॉक्‍टरांच्या कार्याची दखल घेत केलेला सन्मान ही डॉक्‍टरांना प्रोत्साहन देणारी बाब असल्याचे
गौरवोद्‌गार त्यांनी काढले.

'सकाळ' माध्यम समूहाच्या वतीने आज डॉक्‍टर्स डेच्या निमित्ताने जिल्ह्यातील मान्यवर डॉक्‍टरांचा सन्मान करण्यात आला. मिरज रोडवरील ग्रेट मराठा येथे झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते डॉक्‍टरांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी लाईफ सायन्सेस मिरॅकलचे एम. डी. शंकरशेठ बुधवाणी, सांगली आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील, मिरज आयएमएचे अध्यक्ष डॉ. किरण प्राणी उपस्थित होते. डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, 'सकाळ' समूह चांगल्या कामाची नेहमी दखल घेतो. डॉक्‍टरांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान केला. आज फास्ट फूड, जंक फुडमुळे लहान मुलांमध्ये ओबेसिटी वाढत आहे. आयुर्मान वाढल्याने वृध्दांचे प्रश्‍न वाढत आहेत त्याचा विचार करण्याची गरज आहे. स्पेशालिस्ट डॉक्‍टरांची संख्या वाढली आहे. मात्र फॅमिली डॉक्‍टरची संकल्पना पुन्हा येण्याची गरज आहे.' जिल्हाधिकारी काळम पाटील म्हणाले, सकाळचे उपक्रम दीपस्तंभासारखे आहेत. देशातील सर्वात स्वस्त आणि चांगली रुग्णसेवा सांगली मिरजेत मिळते. मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत म्हणाले, सकाळने विविध उपक्रमांतून सामाजिक दृष्टीकोन जपला आहे. विविध क्षेत्रातील डॉक्‍टर्सना एकत्र आणून त्यांचा सन्मान केला ही अभिनंदनीय बाब आहे.

शंकरशेठ बुधवाणी म्हणाले, डॉक्‍टरांचे महत्व रुग्णांना समजून
सांगण्यासाठी डॉक्‍टर्स डे साजरा केला जातो. डॉक्‍टरांचे महत्व समाजासमोर
आणण्याचे काम "सकाळ'ने या सन्मान सोहळ्यातून केले आहे. सन्मानमूर्ती डॉक्‍टरांच्या वतीने डॉ. मुकुंद पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, सकाळने आमच्या कार्याचे कौतुक केल्याबद्दल अभिनंदन. अशा सत्कारामुळे रुग्णसेवेसोबत सामाजिक काम करण्यास उत्साह येतो. डॉ. सुनील पाटील म्हणाले, सकाळच्या विविध उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. डॉक्‍टरांचा सन्मान केल्याबद्दल सकाळचे धन्यवाद. डॉक्‍टरांकडून चुका झाल्या की हल्ली डॉक्‍टरांना मारहाण, हल्ल्याच्या घटना घडतात हे चुकीचे आहे. डॉक्‍टरसुध्दा माणूसच आहे. त्यांच्याकडून चुका होऊ शकतात. त्यामुळे समाजाने हातात कायदा घेऊ नये, डॉक्‍टरांना समजून घ्यावे. डॉ. किरण प्राणी यांनीही मनोगत व्यक्त केले. 'सकाळ'चे सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी प्रास्ताविक केले. 'सकाळ'च्या विविध उपक्रमांचा आढावा त्यांनी घेतला. चार वर्षांपासून डॉक्‍टरांचा सन्मान करताना डॉक्‍टर आणि समाज यांच्यात पूल जोडण्याचे काम सकाळ करत आहे, असे ते म्हणाले. वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) उदय देशपांडे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

doctors day

या कार्यक्रमास विट्यातील मिरॅकल लाईफ सायन्सेसचे सहकार्य लाभले. यावेळी  वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ऍग्रोवनचे
व्यवस्थापक शीतल मासाळ, जाहिरात विभागाचे राहुल कुलकर्णी, रवींद्र डुबल, परितोष भस्मे, शेखर रसाळ, इम्रान मोकाशी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

सन्मान करण्यात आलेले डॉक्‍टर -
सकाळ माध्यम समूहातर्फे आज डॉ. मुकुंदराव पाठक, डॉ. चंद्रशेखर परांजपे,
डॉ. बिंदूसार पलंगे, डॉ. रियाज मुजावर, डॉ. सपना तिप्पाणावर, डॉ. संदीप
देवल, डॉ. गणेश यमगर, डॉ. प्रभाकर पाटील, डॉ. आर. आर. भोई यांचा
सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

doctors day

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Honor to doctors by Sakal at sangali