जिल्हा परिषदेतून इच्छामरणाआधीच 'त्या' घोड्याने घेतला अखेरचा श्‍वास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

ग्लॅंडर हा श्‍वसन संस्थेशी निगडित प्राण्यांचा आजार आहे. तो अश्‍ववर्गीय म्हणजे घोडा, गाढव, खेचर प्राण्यांनाच होतो. तो संसर्गजन्य आहे. माणसालाही त्याची लागण होऊ शकते, त्यात मृत्यू अटळ असतो. बेळंकी येथील घोड्याला आजाराचे निदान झाल्यानंतर तत्काळ यंत्रणा हालली.

सांगली - 'ग्लॅंडर' या भयानक रोगाचे निदान झालेल्या बेळंकी (ता. मिरज) येथील घोड्याला काल रात्री इच्छामरण दिले जाणार होते. त्याची तयारी सुरू केली होती. मात्र त्याआधीच घोड्याने अखेरचा श्‍वास घेतला. या रोगाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने अतिदक्षता घेतली आहे. परिसरात पाच किलोमीटर परिसरात अश्‍ववर्गीय प्राण्यांची तपासणी सुरू केली आहे.

ग्लॅंडर हा श्‍वसन संस्थेशी निगडित प्राण्यांचा आजार आहे. तो अश्‍ववर्गीय म्हणजे घोडा, गाढव, खेचर प्राण्यांनाच होतो. तो संसर्गजन्य आहे. माणसालाही त्याची लागण होऊ शकते, त्यात मृत्यू अटळ असतो. बेळंकी येथील घोड्याला आजाराचे निदान झाल्यानंतर तत्काळ यंत्रणा हालली. या घोड्याला कायद्यानुसार इच्छामरण देण्याचे ठरले. मात्र त्याआधीच त्याने अखेरचा श्‍वास घेतला. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. या घोड्याला आठ फुटांहून अधिक खोल खड्डा काढून पुरण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांच्याकडे त्याचा प्रस्ताव देण्यात आला. त्यांनी गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. बेळंकीपासून पाच किलोमीटर परिघातील घोड्यांची पशुसंवर्धनमार्फत तपासणी सुरू करण्यात आली आहे. बेळंकीत प्राणिमित्र संघटनेच्या तबेल्यात अन्य सोळा प्राणी असल्याची माहिती आहे. त्यांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे. 

Web Title: horse is died in jilha parishad of belanki taluka miraj