उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांची तक्रार करा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - तातडीच्या औषधोपचारासाठी धनादेश न स्वीकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने आरोग्य विभागाला दिले आहेत. असे उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयासंबंधी 104 तसेच 108 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 

कोल्हापूर - तातडीच्या औषधोपचारासाठी धनादेश न स्वीकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने आरोग्य विभागाला दिले आहेत. असे उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयासंबंधी 104 तसेच 108 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 

पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतर औषध दुकाने तसेच बड्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी कोंडी झाली. एखाद्या रुग्णावर तातडीचे उपचार आवश्‍यक असताना केवळ जुन्या नोटा चालत नाहीत ही सबब सांगून त्या स्वीकारण्यास नकार दिला जात आहे. शासनाने आदेश देऊनही रुग्णालयांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. औषध दुकानात जुन्या नोटा घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. एक तर पाचशे अथवा हजाराच्या पटीतील औषधे घ्या; अन्यथा सुटे पैसे द्या, असे सांगण्यात आले. एखाद्या रोगाच्या निदानासाठी तपासण्या आवश्‍यक असतात. तेथेही नोटा घेण्यास नकार दिला गेला. डॉक्‍टरांनी दिलेली औषधे आणायला तर हवी आणि रुग्णाचे हाल तर पाहवत नाहीत, अशी नातेवाइकांची अवस्था झाली. हृदयरोगासह मधुमेह, हाडांच्या डॉक्‍टरपासून ताप-थंडीवर औषधे देणारेही नोटांना नकार देऊ लागले. रुग्ण अथवा त्याचे नातेवाईक कोणत्या मनःस्थितीत आहेत याचा विचार न करता नकार दिला गेला. त्यावर उपाय म्हणून राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना उपचारापोटी नातेवाईक धनादेश देत असतील तर तो स्वीकारावा, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. हा धनादेश नंतर वटला नाही तर मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून दहा हजारांपर्यंत रक्कम दिली जाईल. धनादेश स्वीकारला नाही आणि त्याचा परिणाम रुग्णसेवेवर झाल्यास तत्काळ तक्रार करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. 108 व 104 या क्रमांकावर तक्रार करा, असा उल्लेख असलेला फलक रुग्णालयाच्या बाहेर लावणे बंधनकारक आहे. एखाद्याने तक्रार केली आणि त्यात तथ्य निघाले तर रुग्णालयावर कारवाई होणार आहे. शासनाचा नवा आदेश हा धनादेशापुरता मर्यादित आहे. ज्यांच्याकडे धनादेशांचे पुस्तक (चेकबुक) आहे त्यांचे ठीक; पण ज्यांच्याकडे अशी व्यवस्था नाही त्यांनी काय करायचे, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे.

Web Title: hospital complaints