ऑक्‍सिजन बेडवरून रूग्णालयात बाचाबाची; प्रशासनाला लागेना ताळमेळ 

रवींद्र माने
Saturday, 5 September 2020

तासगाव तालुक्‍यात कोरोना बेड संख्या वाढली असल्याचे सांगण्यात येत असले तरी कोरोना रुग्णांला बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

तासगाव (जि . सांगली) : तासगाव तालुक्‍यात कोरोना बेड संख्या वाढली असल्याचे सांगण्यात येत असले तरी कोरोना रुग्णांला बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. कोणाला कसलाच ताळमेळ लागत नसल्याचे चित्र आहे. या गोंधळामुळे शहरात चोवीस तासात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये रुग्णांचे सुदैवाने प्राण वाचले. 

तासगावातील कोरोना हॉस्पिटल आणि होणारा त्रास काही थांबण्यास तयार नाही. ग्रामीण रुग्णालयातील 29 ऑक्‍सिजन बेड वगळता अन्यत्र पेड सर्व्हिस दिली जात आहे. याशिवाय विटा रस्त्यावरील खाजगी रुग्णालयातील 50 बेड आणि महिला तंत्र निकेतन हॉस्टेल वर सुरू करण्यात आले. कोविड केअर सेंटरमध्ये 30 बेड उपलब्ध झाले आहेत. असे 110 बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असूनही काल रात्री मोठा गोंधळ झाला. ऑक्‍सीजनसह बेड असल्याचे सांगितले जात आहे.

एका बड्या डॉक्‍टरच्या वडिलाना अत्यवस्थ अवस्थेत काही तास ऑक्‍सिजन शिवाय अंबुलन्समध्ये काढावे लागले. अक्षरशः हातघाईवर आणि अरेतुरे वर आलेला हा गोंधळ प्रशासनाला धाव घेऊन निस्तरावा लागला. दुसऱ्या घटनेत ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या आणि अत्यवस्थ झालेल्या रुग्णाला पुढील उपचारासाठी सांगलीला धाव घ्यावी लागली. सुदैवाने या रुग्णाला सांगली शासकीय रुग्णालयात बेड मिळाल्याने जीव वाचला. गाजावाजा करत दोन मोठ्या हॉस्पिटलची उदघाटने झाली मात्र गोंधळ काय थांबण्यास तयार नाही. 

रूग्ण घेण्यास टाळाटाळ 
हा गोंधळ सुरू असतानाच शहरातील शासनाने ताब्यात घेतलेल्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल करून घेतले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. यापैकी एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेले कोरोना उपचार सुरू असलेले रुग्ण गेले कोठे ? याचा पत्ता लागलेला नाही. ही हॉस्पिटल शासनाने ताब्यात घेतल्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. या हॉस्पिटलचे डॉक्‍टर्स कोविड केअर सेंटरवर बिझी आहेत तर मग ही हॉस्पिटल ताब्यात कशासाठी घेतली असा प्रश्न पडला आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hospitalized from oxygen bed at Tasgao; Coordination without the administration