प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

कोल्हापूर - ""राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा मुला-मुलींसाठी यंदापासून वसतिगृह सुरू केली जाणार आहेत. याबाबत कॅबिनेटमध्ये लवकरच निर्णय घेतला जाणार असून, ज्या ठिकाणी वसतिगृहासाठी जागा उपलब्ध होणार नाही, त्या ठिकाणी भाड्याने इमारत घेऊन तेथे वसतिगृह सुरू केले जाईल,'' अशी घोषणा महसूलमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. 

कोल्हापूर - ""राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा मुला-मुलींसाठी यंदापासून वसतिगृह सुरू केली जाणार आहेत. याबाबत कॅबिनेटमध्ये लवकरच निर्णय घेतला जाणार असून, ज्या ठिकाणी वसतिगृहासाठी जागा उपलब्ध होणार नाही, त्या ठिकाणी भाड्याने इमारत घेऊन तेथे वसतिगृह सुरू केले जाईल,'' अशी घोषणा महसूलमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. 

राजर्षी शाहू सांस्कृतिक भवन येथे आज झालेल्या मराठा आमसभेत ते बोलत होते. दरम्यान, मराठा भवनासाठी शासकीय जागा द्यावी, यासाठी उद्या (सोमवार) सर्व पक्षीय आमदार व नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी इतिहास संशोधक डॉ. वसंतराव मोरे होते. 

पाटील म्हणाले, ""या वर्षीपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थांसाठी वसतिगृह सुरू केली जातील. प्रत्येक जिल्ह्यातील एकूण पाचशे विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश केला जाईल. अडीचशे मुली व अडीचशे मुले असे नियोजन केले जाईल. कॅबिनेटमध्ये हा विषय आणला जाणार असून, तो सर्वानुमते मान्यही केला जाईल. मराठा आरक्षणाचा विषय आता मागास आयोगाकडे जाणार आहे. मागास आयोगाने मराठा समाज आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे मान्य केल्यास सरकारही ते मान्य करेल. हाच मुद्दा घेऊन मराठा समाजाला आरक्षण देता येईल.'' 

आदर्श आचारसंहिता ठरवून ती मराठा समाजाने आचारणात आणली पाहिजे. मुलींना शिक्षण, व्यवसाय, खेळांमध्ये प्राधान्य दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. 

मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे म्हणाले, ""गुणवत्तेवर आधारित व घटनात्मक दृष्टीने योग्य असणारे आरक्षणच न्यायालयात टिकणार आहे. जगातील स्पर्धेत टिकण्यासाठी मराठा समाजातील तरुणांनी आत्मचिंतन केले पाहिजे.'' 

खासदार संभाजीराजे म्हणाले, ""मराठा समाजाने आपल्यावर काय अन्याय होतोय, हे आता सांगितले पाहिजे. मराठ्यांनी आजपर्यंत अठरा पगड जातींना बरोबर घेऊनच सर्वांना न्याय दिला आहे. मराठ भवनातून नव्या पिढीसाठी मार्गदशक काम झाले पाहिजे. या भवनात सुसज्ज ग्रंथालय, विज्ञान केंद्र उभारण्यासाठी जी काही आर्थिक मदत लागेल ती देण्यास आपण तयार आहे.'' 

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ""ओबीसी आयोगात मराठा समाजाचा समावेश व्हावा, यासाठी लोकसभेत आपण मागणी केली आहे. मराठा भवन दर्जेदार व्हावे, त्यातून मराठा मुला-मुलींना शैक्षणिक प्रोत्साहन व प्रेरणा मिळाली पाहिजे.'' 

आमदार सतेज पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार चंद्रदीप नरके, म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, आमदार उल्हास पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, डॉ. बी. एम. हिर्डेकर, चंद्रकांत जाधव, माजी आमदार सुरेश साळोखे, बजरंग देसाई, अरुण इंगवले, इंद्रजित सावंत, सत्यजित कदम, सारंगधर देशमुख, भगवान काटे, संजय पाटील उपस्थित होते. 

Web Title: Hostel for Maratha students in every district