पर्यटनासाठी किनारपट्ट्या हाउसफुल

मयूरेश पाटणकर
रविवार, 25 डिसेंबर 2016

सिंधुदुर्ग, रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात बुकिंग; नोटाबंदीनंतर दूर होऊ लागले मंदीचे सावट

सिंधुदुर्ग, रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात बुकिंग; नोटाबंदीनंतर दूर होऊ लागले मंदीचे सावट
कोल्हापूर - पर्यटन हंगामात डिसेंबर महत्त्वाचा महिना आहे. नाताळ सणाची सुटी आणि सरत्या वर्षाचे लागलेले वेध यामुळे कोकणातील प्रसिद्ध समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे गजबजू लागली आहेत. नोटाबंदीमुळे काही काळ पर्यटनावर जाणवत असलेली मंदी ओसरू लागली आहेच; पण जोरदार बुकिंगमुळे पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली डेस्टिनेशन हाउसफुल होऊ लागली आहेत.

गुहागर - कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुरूड, कर्दे, गुहागर, गणपतीपुळे, रत्नागिरी यांना सर्वाधिक पसंती आहे. त्याचबरोबर दाभोळ फेरीबोटमधून रात्रीच्यावेळी खाडी सफर आणि वाशिष्ठी नदीतील मगर दर्शन हेही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. परिसरातील घरगुती निवास न्याहारी योजना तुलनेत कमी खर्चिक असतात. स्वच्छ, सुंदर आणि विस्तीर्ण किनारे, हिवाळ्यातील आल्हाददायक वातावरणामुळे कोकण सध्या हॉट डेस्टिनेशन आहे.
धार्मिक पर्यटनापेक्षा हौसेच्या पर्यटनासाठी किनाऱ्यांना पसंती आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड, कर्दे, गुहागर, गणपतीपुळे या समुद्रकिनाऱ्यांवर ऍडव्हेंचर स्पोर्टस्‌चीही सुविधा आहे. मोदक, वडे घाटले, पुरणपोळी अशा शाकाहारी अन्नपदार्थांबरोबर मटण वडे, भंडारी पद्धतीचे चिकन, ताज्या माशांपासून बनविलेले विविध पदार्थ अशा खास कोकणातील रुचकर आहारांनी पर्यटकांची हौस भागविली जात आहे.

त्यामुळेच पर्यटनस्थळांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. ऐतिहासिक स्थळे, किल्ले, मंदिरे यांच्याकडे मात्र पर्यटकांचा ओढा तुलनेने कमी आढळतो.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मधल्या काळात नोटाबंदीनंतर पर्यटनावर जाणवत असलेली मंदी वर्षाखेरीच्या पर्यटनासाठी तारकर्ली, देवबागसह शहरातील विविध रिसॉर्टमध्ये पर्यटकांनी केलेल्या जोरदार आरक्षणामुळे ओसरली असल्याचे चित्र दिसते. पर्यटन हंगामाची सुरवात सप्टेंबर महिन्यापासून सुरू होत असली तरी दिवाळी, नाताळची सुटी आणि "इयर एंडिंग'च्या काळात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होतात. समुद्र अथवा खाडी किनारपट्टीवरील हॉटेल्सनाही पर्यटकांकडून पहिली पसंती आहे.

ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला दर्शन, स्क्‍युबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, बोटिंगची सफर यांसह अन्य साहसी जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडणार आहे.

पर्यटकांचा ओघ वाढण्यास सुरवात झाल्याने; तसेच किमती मासळीची मागणी वाढल्याने मासळीच्या दरात वाढ झाली आहे. सुरमई, पापलेट, म्हाकुल, चिंगूळ, बांगडा, मोरी माशांचे दर वाढले आहेत. मासळी दरात वाढ झाल्याने मत्स्याहारी ताटांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.

हौसेच्या पर्यटनासाठी
धार्मिक पर्यटनापेक्षा हौसेच्या पर्यटनासाठी किनाऱ्यांना पसंती आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड, कर्दे, गुहागर, गणपतीपुळे; तर सिंधुदुर्गमधील तारकर्ली, देवबागसह विविध ठिकाणी बुकिंगला प्रतिसाद मिळाला आहे. स्क्‍युबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, बोटिंगची सफर यांसह अन्य साहसी जलक्रीडा प्रकारांची सुविधा उपलब्ध आहे.

Web Title: Housefull tourism sea beach