esakal | गुढीपाडव्यानंतर घरे महागणार; सांगली 'क्रेडाई'चा निर्णय; बांधकाम खर्च वाढल्याचा परिणाम 

बोलून बातमी शोधा

Houses to become more expensive after Gudipadva; Decision of Sangli 'Credai'; Consequences of rising construction costs

गुढीपाडव्यानंतर सदनिकांचे दर 500 ते 600 रुपये प्रति चौरस फूट वाढवण्याचा निर्णय क्रेडाईच्या नवीन संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

गुढीपाडव्यानंतर घरे महागणार; सांगली 'क्रेडाई'चा निर्णय; बांधकाम खर्च वाढल्याचा परिणाम 

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : बांधकाम साहित्यामध्ये झालेली भरमसाट वाढ, वाढीव मजुरी, जीएसटी, शासकीय रॉयल्टीचे दर यांमुळे बांधकाम खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे गुढीपाडव्यानंतर सदनिकांचे दर 500 ते 600 रुपये प्रति चौरस फूट वाढवण्याचा निर्णय क्रेडाईच्या नवीन संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे घरे, सदनिकासह बांधिव मिळकती महागण्याची चिन्हे आहेत.

 
बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाईचे अध्यक्ष रवींद्र खिलारे म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी सांगलीला महापुराने वेढून कोट्यवधींचे नुकसान केले. त्यानंतर गतवर्षी कोरोनामुळे सरकारने टाळेबंदी जाहीर केल्याने सगळेच अर्थचक्र थांबले. कोरोनानंतर बांधकाम व्यवसायाची गाडी रुळावर येईल, असे वाटत असताना बांधकाम साहित्यांच्या किमतीमध्ये भरमसाट वाढ झाली.

सळी व सिमेंटचे दर गेल्या सहा महिन्यांपासून सतत वाढत आहेत. ते आणखी वाढतील, असा सळी व सिमेंट कारखानदारांचा सूर आहे. सळी साठ हजार रुपये प्रति टन व सिमेंट 400 रुपये प्रति पोते या दरानुसार वाढ होईल, अशी शक्‍यता आहे. मुरूम, खडी, क्रश सॅण्ड, प्लास्टर सॅण्ड यांच्या दरामध्ये झालेली वाढ व पीव्हीसी मटेरियलमध्ये अचानक झालेली 40 टक्के दरवाढ, लाल विटांमध्ये झालेली 40 टक्के दरवाढ या सर्व साहित्यांचे दरही ऐतिहासिक पातळीवर वाढलेले आहेत. 


याबरोबरच गेले वर्षभर पेट्रोल व डिझेलमध्ये सतत होत असलेल्या दरवाढीमुळे वाहतूक खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर सेंट्रिंग काम, बांधकाम गिलावा, प्लंबिंग, फरशी काम आदी कामांच्या मजुरी दरामध्ये जवळपास 20 ते 25 टक्के इतकी दरवाढ केली असून, बांधकाम कामगारांचा तुटवडा भासत आहे. या सर्व कारणांमुळे बांधकामाचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. हा सर्व खर्च गेले एक ते दीड वर्ष बांधकाम व्यावसायिक स्वतः सोसत आहेत. 

हातात काहीच नफा शिल्लक राहत नाही
महापालिकेच्या विकास शुल्कमध्ये रेडिरेकनर संलग्न दरामुळे भरमसाट वाढ झाली आहे. बॅंकांचे व्याज व सर्व प्रकारचे कर भागवून हातात काहीच नफा शिल्लक राहत नाही. त्यामुळे बांधिव मिळकतीमध्ये 500 ते 600 रुपये प्रति चौरस फुटास वाढवण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांनी गुढीपाडव्यापर्यंत घर, सदनिका, बांधिव मिळकती खरेदी किंवा बुकींग करण्याबाबत विचार करावा. 
- रवींद्र खिलारे- पवार, अध्यक्ष, क्रेडाई, सांगली. 

संपादन : युवराज यादव