माणसांइतकीच सर्जाच्या जिवाची किंमतही लाख मोलची

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

एनडीआरएफच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करत महापुरात अडकलेल्या माणसांची सुटका केली. मात्र, मुक्या जनावरांकडे कुणीच बघत नव्हतं. शेतकरी स्वत: सुरक्षित स्थळी जात होते मात्र, मागे बैलगाड्याला तसाच राहिलेल्या लाडक्या सर्जामध्ये त्यांचा अर्धा जीव अडकला होता. 

सांगली : सांगलीच्या महापुरात माणसांचेच एवढे हाल झाले तर जनावरांचं काय होणार हा प्रश्न न विचारलेलाच बरा. पुण्या-मुंबईहून अनेक बचाव पथकांनी त्वरीत कोल्हापूर-सांगलीकडे धाव घेतली. माणसांना मदत करायची दृष्टीने. गावात पाऊल ठेवलं तेव्हा माणसं वाचविण्यासाठी सर्व जिवाचं रान करत होते. अशातच लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र आणि RESQ चॅरिटेबल ट्रस्ट या बचाव पथकांनी संपूर्ण सांगलीत प्राण्यांची सुटका करण्याची मोहीम हाती घेतली. 

Image may contain: 1 person, outdoor

एनडीआरएफच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करत महापुरात अडकलेल्या माणसांची सुटका केली. मात्र, मुक्या जनावरांकडे कुणीच बघत नव्हतं. शेतकरी स्वत: सुरक्षित स्थळी जात होते मात्र, मागे बैलगाड्याला तसाच राहिलेल्या लाडक्या सर्जामध्ये त्यांचा अर्धा जीव अडकला होता. 

या दोन्ही बचाव पथकांनी सांगलीत पाऊल ठेवले तेव्हा फक्त सर्वदूर नदी दिसत होती जिनं आता समुद्राचं रुप घेतलं होतं. ती नदी पार करुन गावात पाऊल ठेवल्यावर रस्त्यावर रस्त्यावर पुरामुळे जीव गेलेल्या प्राण्यांचा खच पडला होता. 

महापुरात कसेबसे स्वत:चा प्राण वाचवू शकलेल्या प्राण्यांचा त्यांनी शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. अनेक प्राण्यांना सलाईनही लावण्यात आले. आता सांगलीतील पाणी उतरु लागले आहे त्यामुळे माणसांची रेलचेल पुम्हा सुरु झाली असून गावातील डॉक्टरांनीही प्राण्यांवर उपचार करण्यास सुरवात केल्याने ही बचाव पथकं माघारी आली आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How animals were rescued from Kolhapur and Sangli Flood