निवृत्त होताय, मग पैशांचं काय करायचं ठरलंय ? 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

पण, यापैकी काही लोकांची अवस्था नटसम्राटमधील अप्पासाहेब बेलवकरांसारखी होऊ नये, याचीही काळजी घ्यायलाच हवी. अशा लोकांना गुंतवणुकीबाबत सल्ला देताना सांगलीतील गुंतवणूक सल्लागार राजेश भाटे म्हणाले, 

सांगली ः आज रविवार, 31 मे... आजच्या दिवशी सांगली जिल्ह्यातील सुमारे पाचशे सरकारी, निमसरकारी कर्मचारी निवृत्त होत आहेत. खासगी क्षेत्रात निवृत्त होणाऱ्यांची संख्याही जवळपास एवढीच असणार आहे. या लोकांच्या हाती निश्‍चितच चांगले निवृत्ती वेतन येणार आहे. ही रक्कम काही लाखांच्या पटीत असणार आहे. ती योग्य ठिकाणी गुंतवली जाणे महत्वाचे असते. या लोकांचे उर्वरीत आयुष्य समर्थपणे, उत्तमपणे आणि स्वाभिमानाने व्यतीत व्हावे, यासाठी आर्थिक सुत्रे त्यांच्या हाती राहणे गरजेचे असते. त्यासाठी या वेतनाची योग्य गुंतवणूक महत्वाची ठरते. 

आज वयाची 58 वर्षे पूर्ण केलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. कारण, 1 जून ही बहुतेक लोकांबाबत शिक्षकांनी ठरवलेली जन्मतारिख असते. शाळेत नाव दाखल करताना या लोकांना जन्मतारिख माहितीच नव्हती. शिक्षकांनीच ती ठरवली, असे बहुतेक लोकांबाबत आहे. ते आता निवृत्त होतील आणि पुढचे आयुष्य आनंदात जगतील, अशा त्यांना शुभेच्छा.

पण, यापैकी काही लोकांची अवस्था नटसम्राटमधील अप्पासाहेब बेलवकरांसारखी होऊ नये, याचीही काळजी घ्यायलाच हवी. अशा लोकांना गुंतवणुकीबाबत सल्ला देताना सांगलीतील गुंतवणूक सल्लागार राजेश भाटे म्हणाले, 
* फिक्‍स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवा. 50 हजारापर्यंत व्याजावर कर माफी आहे. शिवाय, खात्रीशीर पैसे राहतात. त्यामुळे निवृत्त लोक या गुंतवणुकीलाच प्राधान्य देतात. 
* म्युचुअल फंड आणि शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, मात्र त्याला अभ्यास करावा लागतो. अभ्यास करण्याची तयारी असेल तर त्याचा पर्याय चांगला आहे. 
* व्याज जास्त मिळते म्हणून पतसंस्था किंवा छोट्या सहकारी बॅंकांकडे जावू नका, हा मुख्य सल्ला राहील. 
* निवृत्त वेतनासाठी आधीच विम्यात गुंतवणूक केली असेल तर उत्तमच, पण केलेली नसेल तर काही खासगी कंपन्या मेडिक्‍लेम करतात. थोडा प्रिमियम जास्त असतो, मात्र आरोग्याचा धोका पाहता ते घेणे गरजेचे आहे. 
* काही लोकांना व्यवसायात गुंतवणूक करता येऊ शकेल. अर्थात, त्यासाठी त्याचा अभ्यास करावा लागेल. 

* सोन्या-चांदीत गुंतवणूक करता येऊ शकते, मात्र दर पडतील की वाढतील, याचा आता काहीच अंदाज करता येत नाही. नोटबंदीनंतर परिस्थिती अस्थिर आहे. काहीही घडू शकते. शेअर मार्केट, इंधन करात बदल झाले तर सोने बाजारावर परिणाम होऊ शकतो. शिवाय, सोने घरी ठेवणे खूप धोकादायक असू शकते. 
* निवृत्त लोक शक्‍यतो प्लॉटमध्ये गुंतवत नाहीत. कारण, दीर्घकाळ वाट पहावी लागते. 
* आर्थिक सूत्रे स्वतःच्याच हातात ठेवावीत. कुठलीही गोष्ट सांगून येत नाही. 
* संयुक्त खात्यावर पैसे ठेवता येतात, त्यासाठी वारसदाराची अधिकृत नोंद करावी.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to invest after retirement, 500 plus people retire today in sangli district