रस्ते, गटारांभोवती किती काळ फिरणार?

sangali
sangali

सांगली : रस्ते, गटारी, अस्वच्छता आणि डासांचा उपद्रव या प्रश्‍नांभोवती अजून किती काळ फिरत बसणार आहेत. सांगली बकाल होत चाललेली असताना कारभारी म्हणून तुम्हाला कशाचेच गांभीर्य नाही. काम करायचे असेल तरच निवडणुकीला उभे राहा, असा जोरदार हल्लाबोल प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांनी "सकाळ संवाद' उपक्रमात केला.

नेमिनाथनगर, चांदणी चौक, सिव्हिल परिसर, धामणी रोड अशा परिसराचा समावेश असलेल्या या प्रभागातील नागरिक, नगरसेवक, माजी नगरसेवक, इच्छुक आणि तेथील प्रमुख पक्षनेत्यांनी यात सहभाग घेतला. येथील राजमती भवनमध्ये तीन तास खल चालला. व्यासपीठावर माजी महापौर सुरेश पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, माजी उपमहापौर शेखर इनामदार, नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, प्रदीप पाटील, मृणाल पाटील, अंजना कुंडले होते. "सकाळ'चे सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी प्रास्ताविक करताना शहराच्या विकासाला गती देण्याची दिशा ठरवणारा हा उपक्रम असल्याचे स्पष्ट केले.

नागरिकांचे मत
"दोन वर्षांनी नगरसेवकांचे दर्शन घडतेय. नागरिकांच्या अपेक्षा खूप छोट्या आहेत, त्याही तुम्ही पूर्ण करू शकत नाही. आम्हाला शासकीय कामांत अडचणीला एक मदतनीस देऊ शकत नसाल तर उपयोग काय? तुमचे कार्यालय सापडत नाही, सापडले तर नगरसेवक हजर नसतात. प्रभाग सभा होत नाहीत. प्रश्‍न मांडायचे कुठे? आयुक्त फाईल पुढे सरकवत नसतील तर आम्हाला सांगा, आम्ही त्यांच्यावर मोर्चा काढतो. आता चित्र बदलू द्या, काम करायचे असेल तरच निवडणुकीला उभे राहा.''

- अर्चना मुळे, सामाजिक कार्यकर्त्या

"सांगलीची अवस्था बकाल झालीय. अधिकारी जागेवर नाहीत. आयुक्त, अधिकारी बिनकामाचे असतील तर त्यांना बदलून का टाकत नाही. भाजपचे चार आमदार, एक खासदार असून उपयोग काय? पार्किंगचे नियोजन, रस्ते वाहतूक, चेन स्नॅचिंग या प्रश्‍नांवर काही उत्तरे शोधणार आहात की नाही? तुम्हाला निवडणूक कशासाठी दिले जाते याचे भान ठेवा.''

- शंकरराव शिंदे

"या प्रभागातील नागरिकांना आधी पायाभूत सुविधा देतानाच ऑक्‍सिजन पार्क, प्राणी संग्रहालय, क्रीडांगणासारख्या सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. नगरसेवक नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध राहिला पाहिजे. ड्रेनेज, पिण्याचे पाणी या समस्या लवकर सुटल्याच पाहिजेत. त्यासाठी किती काळ झगडा करायचा. तसे व्हिजन असणाऱ्यांनाच नागरिकांनी बळ दिले तरच प्रभागाचे चित्र बदलू शकणार आहे.''

- बाहुबली कबाडगे, शिक्षण संस्थाचालक

"प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी नगरसेवकांनी पूर्णवेळ दिलाच पाहिजे. कचऱ्याबाबत जागृती केली पाहिजे. काहीतरी कारणे सांगून प्रश्‍नांना बगल दिली तर प्रभाग भकासच राहील.''

- गीतांजली ढोबे-पाटील

"नगरसेवकांच्या घराच्या गेटपर्यंत पथदिवे लागले आणि सामान्य नागरिकांचे रस्ते अंधारात, अशी स्थिती आहे. ड्रेनेज व्यवस्था विचित्र आणि त्रासदायक आहे. पिण्याचे पाणी वरच्या मजल्यावर चढतच नाही, कारण मागे मोटारी लावल्या आहेत. या साऱ्याचे नियोजन आधी नीट करा.''

- लता डफळे

"या प्रभागात क्रीडांगणांचा विकास झाला नाही. ड्रेनेजचा प्रश्‍न मोठा आहे. पिण्याचे पाणी वरच्या मजल्यावर येतच नाही.''

- प्रीती चिमण्णा

"नगरसेवक तीन वर्षांनी भेटताहेत. तोंड बघून त्यांनी कामे केली आहेत. रस्ता, डास समस्यांनी थैमान घातले आहे. 24 तास पाणी देणार होते, तासभरही येत नाही. आता काम करणार असाल तरच उभे रहा. हजेरीची माणसे नेमून पत्रके पाठवू नका, तुम्ही स्वतः आला तरच विचार करू, अन्यथा हाकलून देऊ. महापालिका करणे ही आधी चूक होती, त्यात असले कारभारी ही मोठीच चूक आहे.''

- दत्ता चव्हाण

"नेत्यांच्या कुटुंबातील लग्नासाठी तत्परतेने रस्ते होतात, पण लोकांच्या समस्या सोडवायला निधी नसतो, असे का? 100 फुटी रस्त्यावर दोन बळी गेले तरी तो रस्ता नीट होत नाही. पाणी प्रश्‍न सुटत नाहीत.''

- कौस्तुभ कुलकर्णी

"स्मार्ट सिटीमध्ये आपण कुठेच नाही. निधी पुरेसा नाही. त्यावर खोलात जाऊन विचार करण्याची आणि बदलाची गरज आहे.''

- संगीता सुनके, माजी नगरसेविका

"हे निवृत्तांचे शहर होतेय. इथल्या तरुणाला रोजगार नाही. त्यावर कधी बोलणार? अजूनही रस्ते, गटारी, डुकरे, डास यावर अडकून पडलो आहोत. काय अवस्था आहे की? आपण मैदाने संपवली, उद्यान बंद, म्युझियम नाही. आधी व्हिजन बदला, मगच शहर बदलेल.''

- सदानंद गायकवाड, अनिवासी भारतीय

"गेल्या चार वर्षांत काहीही काम झाले नाही, शेवटच्या वर्षात काम करताहेत. ही फसवणूक आहे. दत्तनगरचे ड्रेनेज, सांडपाणी मोठा प्रश्‍न आहे. नागराज कॉलनीच्या समस्या सुटल्या नाहीत. भूखंडात डुकरे, मोकाट कुत्री, डासांची समस्या आहे. गटारीच्या आधी रस्ते करून पैसे पाण्यात घातले आहेत. आमदारांची कामे आपल्या पुस्तकात छापून श्रेय लाटले जातेय.''

- लक्ष्मण नवलाई, माजी नगरसेवक

"नगरसेवक प्रभागांनाच विसले आहेत. घंटागाडी थांबत नाही. ड्रेनेजसाठी रस्ते खोदले, काम झाले नाही, आता रस्ते किती दिवस असेच राहणार? किमान तेथे मुरमीकरण करा. पिण्याचे पाणीही पुरेसे देऊ शकत नाही.''

- दीपा बनकर

"पुणे मेट्रो ट्रेनचा, सोलापूर स्मार्ट सिटीचा, कोल्हापूर हद्दवाढीचा विचार करतेय, आपण अजून डास, डुकरे, गटार यातच आहोत. स्मार्ट व्हायचा विषय फार लांबचा. इथे प्रभाग सभा होत नाहीत. कचरा उठाव करायला फायली कशाला पुढे सरकाव्या लागतात? टक्केवारी असेल तरच फाईलीचा प्रश्‍न येतो. नेत्यांच्या घरापर्यंत रस्ता होतो, मात्र सामान्यांचे पाय चिखलातच रुतलेले आहेत.''

- ऍड. अरुणा शिंदे

"समस्यांचा डोंगर उभा आहे. तरुणांच्या हितासाठी इथे कुणीच काही बोलत नाही. समस्यांवर उतारा शोधण्यासाठी चांगल्या माणसांची गरज आहे. नगरसेवक तोंड दाखवत नाही, मग प्रश्‍न सुटणार कसे?''

- मारुती नवलाई, सामाजिक कार्यकर्ते

नगरसेवकांचे उत्तर -

"गेल्या दहा वर्षांत दिवसरात्र लोकांसाठी उपलब्ध राहिलोय. कुणाच्या कामाचे श्रेय घेतले नाही, प्रभागात कामे खेचून आणली आणि ज्यांनी निधी दिला त्यांना श्रेयही दिले. प्रभागात 11 ठिकाणी सीसीटीव्ही लावून महिला सुरक्षेचा प्रयोग सर्वप्रथम यशस्वी केला आहे. ओपन जीमसाठी आमदार शिवाजीराव देशमुख यांच्या निधीतून पैसे आणले. ड्रेनेज योजनेबाबत काही तांत्रिक अडचणी आहेत, प्रश्‍न आहेत, मात्र तेही लवकर सुटतील. भाजी मंडईसाठी मी आग्रही आहे. रस्त्यांची बहुतांश कामे मार्गी लावली आहेत. काही कामे बाकी राहिली, हे मान्य, मात्र तीही लवकरच होतील.''

- दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक

"गेली दोन वर्षे प्रलंबित फाईल मार्गी लावण्यासाठी ताकद लावली आहे. 24 तास पाणीपुरवठा योजना महाआघाडी काळातील होती, मात्र एका टाकीवर ते शक्‍य नव्हते. त्यातून मार्ग निघतोय. रस्त्यांबाबत मी जे मंजूर करून घेतले, तेथेच खो घालण्यात आला. काम अडवून टाकले. आयुक्तांकडून सातत्याने फायली अडवल्या जात आहेत. साफसफाईला कर्मचारीच कमी आहेत, ते भरले पाहिजेत, 2004 नंतर भरती झालेली नाही. मनपाचे उत्पन्न कमी असल्याने विकासाला पुरेसा निधी मिळत नाही. तरीही आम्ही संघर्ष करून कामे खेचून आणतोय.''

- मृणाल पाटील, नगरसेवक

"गेल्या पाच वर्षांत रस्त्यांची कामे केली. लोकांच्या अनेक समस्या सोडवल्या. शक्‍य तेथे पोहोचलो आहोत, मात्र आम्ही काही केलेच नाही, असा आरोप राजकारणातून होऊ नये. अजून खूप काम बाकी आहे, तेही केले जाईल.''

- अंजना कुंडले, नगरसेवक

"माझ्याकडून 100 टक्के समाधान झाले नाही, मात्र गेल्या पाच वर्षांत सर्वाधिक निधी या प्रभागात आणला आहे. 13 कोटींची कामे केली आहेत. ड्रेनेजचे 90 टक्के काम केले आहे. ते जोडणे बाकी आहे, सहा महिन्यात तेही पूर्ण होईल.''

- प्रदीप पाटील, नगरसेवक

नेत्यांचे मत - 

"महापालिकेत प्रशासन आणि नगरसेवकांत अभूतपूर्व विसंवाद आहे. सभागृहाचे निर्णय प्रशासन मान्य करत नसेल तर नगरसेवकांनी करायचे काय? जाहीरनाम्यातील वचन पूर्ण करण्याची नगरसेवकांची जबाबदारीच आहे. सर्वच पातळीवर बरीच ढिलाई आहे. कल्पद्रूम क्रीडांगणावरील व्यावसायिक कार्यक्रम बंद झाले पाहिजेत. ड्रेनेज जोडून घेतले पाहिजेत, प्रभाग तेथे ग्रंथालय व व्यायामशाळा झाली पाहिजे. मूलभूत प्रश्‍नांसह शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी काम करण्याची गरज आहे.''

- सुरेश पाटील, माजी महापौर

"लोकांनी कॉंग्रेसला सत्ता दिली आहे, प्रश्‍न कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना विचारले पाहिजेत. आयुक्त फायली का तटवतात? त्यात भानगड नसेल तर आव्हान द्या. ते सरकारचे कर्मचारी आहेत, भाजपचे नव्हे. आर्थिक अडचणी सांगण्याऐवजी उत्पन्न का वाढवले नाही. भूखंड का जपले नाहीत. पाणीपट्टी, घरपट्टीची योग्य वसुली होते आहे का? प्रभागनिहाय वसुलीसाठी केंद्र सुरू करा. राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते ठेवून त्यानंतर शहराचा विकास या मुद्द्यावर साऱ्यांनी एकत्र आले तरच सांगलीचे भवितव्य चांगले होईल.''

- शेखर इनामदार, माजी उपमहापौर

"आमदार सुधीर गाडगीळ यांच्यामुळे रस्त्याची कामे होत आहेत. रस्ते, गटारी, ड्रेनेजची समस्या सगळीकडे आहे. ओला कचरा, सुका कचरा याबाबत समस्या निर्माण झाल्या आहेत. घंटागाडीवाले ओला कचरा घेत नाहीत. त्यात सुधारणा गरजेची आहे. खुले भूखंड लोकांची जबाबदारी आहे. किमान कुंपण घालणे गरजेचे आहे.''

- नीता कळेकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष

"रस्ता, गटारी करणे हे नगरसेवकांचे काम नाही. त्यांनी शहराच्या सामाजिक, आर्थिक, पर्यावरण, वाहतूक, कचरा व्यवस्थापनाचे धोरण ठरवायचे आणि प्रशासनाने त्याची अंमलबजावणी करायची असते. इथे नेमके उलटे झाले आहे. ह्यांना चांगले दवाखाने, शाळा देता येत नाहीत. आम्ही पालिकेच्या बाहेर असून कामे करून घेतो, हे आत असून हतबल का?''

- ऍड. अमित शिंदे, सांगली सुधार समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com