किती काळा पैसा जमा झाला? - प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

संगमनेर - 'नोटाबंदीचा त्रास काळ्या पैशावाल्यांना होत नसून, सर्वसामान्यांना होत आहे. किती काळा पैसा जमा झाला, याचा खुलासा सरकारने करावा,'' असे आवाहन भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज केले.

संगमनेर - 'नोटाबंदीचा त्रास काळ्या पैशावाल्यांना होत नसून, सर्वसामान्यांना होत आहे. किती काळा पैसा जमा झाला, याचा खुलासा सरकारने करावा,'' असे आवाहन भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज केले.

सत्यशोधक विचार मंच व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांनी "बहुजन हिताय-बहुजन सुखाय' या विषयावर आंबेडकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते, त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजित नवले होते. 'राज्यकर्त्यांनी सत्ता नागरिकांच्या सोयीसाठी वापरली पाहिजे. हे सरकार तर नागरिकांची गैरसोय होईल असे निर्णय घेत आहे,'' अशी टीका करून आंबेडकर म्हणाले, 'सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन धोरणे आखली पाहिजेत. बहुजनांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्यास देशात अराजक निर्माण होईल. या निर्णयाने शेतकरी, शेतमजूर, कारागीर यांना वाऱ्यावर सोडले आहे. "एटीएम'समोर लागलेल्या रांगा या सरकारचे अपयश आहे.''

'बहुजन हिताय- बहुजन सुखाय' संकल्पना प्रथम भगवान बुद्धांनी मांडली. सर्वसामान्यांचे कल्याण करायचे असल्यास वैदिक परंपरेपेक्षा संतपरंपरा व भगवान बुद्ध ते संत तुकाराम यांनी सांगितल्याप्रमाणे जायला हवे. सार्वजनिक क्षेत्र अधिकाधिक लोकांच्या कल्याणासाठी वापरले पाहिजे. शिक्षण, रोजगार, कृषी या जबाबदाऱ्या सरकारने उचलल्या पाहिजेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही घटनेत सर्वसामान्यांच्या हिताची धोरणे अंतर्भूत केली आहेत. दुर्दैवाने सध्याचे सरकार वैदिक परंपरेनुसार काम करीत आहे,'' अशी टीका आंबेडकर यांनी केली.

या वेळी राष्ट्र सेवा दलाचे प्रांताध्यक्ष राजा अवसक यांच्या "लढा जातीअंताचा, संग्राम सामाजिक समतेचा' पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. शशिकांत माघाडे यांनी प्रास्ताविक व चंद्रकांत पवार यांनी सूत्रसंचालन केले. बंटी साळवे यांनी आभार मानले.

Web Title: How much was deposited black money?, asks Prakash Ambedkar