फेरतपासणीचे गुण अपडेट करा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

३० जूनपर्यंत अर्जाची संधी 
‘सीईटी सेल’ने आर्किटेक्‍चर, हॉटेल मॅनजमेंट अँड केटरिंग टेक्‍नॉलॉजी पदवी अभ्यासक्रमासाठी नवे वेळापत्रक अखेर निश्‍चित केले असून, या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ३० जूनदरम्यान ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर एक जुलैपर्यंत अर्ज निश्‍चितीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या चारही अभ्यासक्रमांचे सविस्तर वेळापत्रक सेलच्या संकेतस्थळावर अवलंबून आहे.

सातारा - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे बारावीच्या निकालाबाबात फेरतपासणीचे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी, त्यांचे बारावीचे गुण ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अर्जात फॅसिलिटेशन सेंटरमध्ये (एफसी) केंद्रावर जाऊन अपडेट करावे; याशिवाय विद्यार्थ्यांनी अर्जात आपली माहिती योग्य भरली आहे की नाही, याची खातरजमा करून आवश्‍यक ते बदल करावेत, अशा सूचना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने दिल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेची अद्ययावत माहिती https://info.mahacet.org/mahacet/ या लिंकवर किंवा ‘सीईटी सेल’च्या संकेतस्थळावर मिळेल. 

सीईटी सेलद्वारे राबविण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्‍चर, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्‍नॉलॉजी या प्रथम वर्ष व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने प्रवेश प्रक्रिया पुन्हा नव्याने राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेत नव्याने अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी ‘सीईटी सेल’ने विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. राज्य मंडळाच्या अनेक विद्यार्थ्यांनी बारावीच्या निकालाबाबात फेरतपासणीचे अर्ज केले आहेत. यापैकी गुणांमध्ये बदल झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्जात एफसी जाऊन आवश्‍यक ते बदल करायचे आहेत. हे बदल विद्यार्थ्यांना तक्रार निवारण दिनांकापूर्वी करायचे आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रकाशित करता येईल, असे ‘सीईटी सेल’ने कळविले आहे.

या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी प्रवेश परीक्षेचा अर्ज भरताना अनेक विद्यार्थ्यांनी चुकीची माहिती भरली आहे. विद्यार्थ्यांनी नाव, वडिलांचे नाव, आडनाव चुकीचे भरले आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी अर्ज स्वीकृती केंद्रावर कागदपत्रांची पडताळणी करताना त्यांचा बैठक क्रमांक आणि अर्ज क्रमांक; तसेच मूळ ओळखपत्र तपासून, त्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे, अशा सूचना केंद्रातील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HSC Rechecking marks update