पावसाने मक्याच्या कणसांना मोड तर तूरीचे प्रचंड नुकसान

नाना पठाडे
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

दुष्काळी स्थितीचा सामना संपेपर्यंत आता परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील तुर, बाजरी, सूर्यफूल पिके पूर्ण वाया गेली आहेत. काडून ठाकलेल्या मकाच्या कणसांना जागेवर मोड आले आहेत, तर तूरही करपू लागली आहे. अशातच सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी भरलेला पिक विमा मिळण्यासाठी नियमाच्या चौकटीत अडकले आहे.

पोथरे (सोलापूर) : दुष्काळी स्थितीचा सामना संपेपर्यंत आता परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील तुर, बाजरी, सूर्यफूल पिके पूर्ण वाया गेली आहेत. काडून ठाकलेल्या मकाच्या कणसांना जागेवर मोड आले आहेत, तर तूरही करपू लागली आहे. अशातच सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी भरलेला पिक विमा मिळण्यासाठी नियमाच्या चौकटीत अडकले आहे.

एकदा पिक विमा भरूनही परत कागदपत्रे द्यावी लागत आहेत. वरून पुन्हा चौकशी बसवल्याने शेतात काम करावे का सरकारचे नियम पूर्ण करावे हेच कळत नाही अशा शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

गतवर्षीच्या भयानक दुष्काळी स्थिती नंतर या वर्षी जून महिन्यात झालेल्या अल्पशा पावसावर करमाळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरिपाची पेरणी केली. त्यानंतर अधून-मधून झालेल्या हलक्‍या पावसावर तग धरून पिके आली होती. मात्र ऐन काढणीच्या अवेळी पावसाने जोर धरल्याने शेतातील पिके पाण्यामुळे पूर्ण वाया गेली आहेत.

कांदा, उडीद, सूर्यफूल हे पाण्यामुळे नासले आहे तर तुरीच्या पिकाला पाणी लागल्याने त्याची पानगळ होऊन फक्त काड्याच राहील्या आहेत. त्यामुळे पिकाचे पूर्ण नुकसान झाले आहे. अशा स्थितीत शासनाने तात्काळ मदत देण्याऐवजी पुन्हा एकदा कागदपत्रे मागवली आहेत. तालुक्‍याला जाऊन सातबारा काढणे फॉर्म भरणे यासाठी वेळ तर जातो शिवाय डबल खर्चही होत आहे. याशिवाय शेतातील सर्व कामे सोडून अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली असून शासनाकडून कागदपत्राची होत असलेली पिळवणूक तात्काळ थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी आधीच अडचणीत आहे. अशा स्थितीत शासनाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता तात्काळ खरिपाचा पिक विमा द्यावा. - गोपिनाथ पाटील, शेतकरी, पोथरे 

कामधंदा सोडून दिवसभर कागदपत्रांसाठी फिरावे लागत आहे. दिवाळीमुळे अनेक अधिकारी सापडत नाहीत. कोणाकडून योग्य माहिती मिळत नाही. अशा स्थितीत पिक विमाच नको अशी मनस्थिती निर्माण झाली आहे. - लक्ष्मण रासकर, शेतकरी, रावगाव
 

सततच्या पावसामुळे तुरीचे नुकसा झाले आहे. फुल गळती होऊन तूर करपू लागली आहे. काढलेल्या मकाच्या कणसांना जागेवर मोड आल्याने नुकसान झाले आहे. याचे त्वरीत पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा अंदोलन केले जाईल. - संजय शिंदे, बिटरगाव (श्री)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: huge damage of agriculture caused Heavy rains in Solapur District