ग्राहकांसाठी यंदा "मिरची गोड' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

सांगली - कर्नाटक, आंध्र प्रदेशात यंदा मिरचीचे प्रचंड उत्पादन झाल्याने दरात 50 टक्‍क्‍यांहून अधिक घसरण झाली आहे. सांगलीसह पश्‍चिम महाराष्ट्रात मिरची बाजार गेल्या वर्षीपेक्षा स्वस्त झाल्याने ग्राहकांसाठी मिरची "गोड' ठरतेय. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत सुमारे 7551 पोती मिरचीची आवक झाली आहे. तुलनेत मसाले पदार्थांच्या दरात मात्र वाढ झाली आहे. 

कर्नाटक, आंध्र हे प्रमुख मिरची उत्पादक राज्ये आहेत. तेथील गोदाम अजूनपर्यंत भरलेली आहे. शेतातील पिके आता कुठे संपली आहेत. त्यामुळे पुरवठा वाढतच राहणार आहे. परिणामी, घसरलेले दर कायम आहेत. चटणी बनवणे यंदा स्वस्त झाल्याने महिलावर्ग थोडा खुशीत आहे. तुलनेत तिखटासाठीच्या मसाले दरात 20 ते 30 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. दालचिनी, तमालपत्री, जिरे, मोहरी, सुके खोबरे आणि मिठाच्या दरात थोडी वाढ आहे. त्यामुळे तयार मसाल्यांच्या दरातही वाढ झाली आहे. 50 ग्रॅम मसाले पाकिटाच्या दरात तीन ते पाच रुपयांची वाढ झाली आहे. पापड मसाला तीन रुपये, पापड खार तीन रुपये, लोणची मसाला पाच रुपये वाढ झाली आहे. 

लाल मिरची : 
गुंटूर - 60 ते 100 रुपये किलो 
तेजा - 90 ते 120 रुपये किलो 
बेडगी - 110 ते 140 रुपये किलो 
बेडगी (पहिला तोडा) - 120 ते 150 रुपये किलो 

""मिरची उत्पादनाचे आगर असलेल्या आंध्र, तामिळनाडून प्रचंड उत्पादन झाल्याने दरात घसरण झाली. आवक कायम असल्याने हे दर स्थिर राहतील किंवा थोडीफार घसरणच होईल, अशी स्थिती आहे.'' 
- अशोक पाटील, मिरची व्यापारी, सांगली

Web Title: huge production of red chilli