‘हुक्का पार्लर’चे फॅड कास रस्त्यावर थांबले!

Hukka-Parlour
Hukka-Parlour

सातारा - शासनाने राज्यातील ‘हुक्का पार्लर’वर नुकतीच बंदी घातली आहे. सुदैवाने सातारा जिल्ह्यात एकही हुक्का पार्लर अस्तित्वात नाही. तथापि, कास रस्त्यावरील तीन कथित फार्महाउसनी हुक्का पार्लर सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली होती, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ‘महानगरांतील साहबजाद्यांचे चोचले येथे चालू देणार नाही,’ असा पवित्रा तत्कालीन अधिकाऱ्यांनी घेतल्याने ‘हुक्का पार्लर’चे फॅड जिल्ह्याच्या सीमेवरच थांबले! 

राज्य शासनाने सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम २००३ मध्ये बदल करत हुक्का पार्लरवर बंदी आणली आहे. ‘हुक्का बार’ असेही त्याला म्हणतात. ‘बिअर बार’प्रमाणेच ‘हुक्का बार’ चालत होता. कायद्यातील नव्या सुधारणेमुळे आता असे ‘हुक्का बार’ चालवता येणार नाहीत. त्याचे उल्लंघन करणाऱ्यास एक ते तीन वर्षे कारावास व ५० हजार ते एक लाख रुपये दंड अशा शिक्षेची कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. 

सातारा जिल्ह्यात अशा पद्धतीचा एकही हुक्का पार्लर अस्तित्वात नाही. हुक्का किंवा गुडगुडीचा उंची शौक करणाऱ्यांच्या सोईसाठी महाबळेश्‍वरमधील दोन-तीन हॉटेलमध्ये हुक्का किंवा गुडगडीचे साहित्य पुरविले जात होते. महाबळेश्‍वरप्रमाणेच कासला येणाऱ्या पर्यटकांना मौजमजेसाठी तीन कथित फार्महाउस चालकांनी हुक्का पार्लर सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली होती, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. पुणे-मुंबईसारख्या महानगरांत हुक्का पार्लरचे फॅड आहे. त्या ठिकाणी तंबाखूबरोबरच त्या अनुषंगाने अनेक बाबी घडत होत्या. या सर्वच बाबी कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या असतात, असेही नाही. महानगरांतील या साहेबजाद्यांचे चोचले जिल्ह्याच्या सीमेवरच अडविण्याची भूमिका तीन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने घेतली. त्यामुळे आज जिल्ह्यात एकही ‘हुक्का पार्लर’ नाही. शासनाने आता बंदी घातल्याने ते नव्याने सुरू होण्याचा प्रश्‍नच नाही!

आयुष्याचे नुकसान... तरीही क्रेझ
महानगरांमध्ये ‘हुक्का पार्लर’चे पेव चांगलेच फुटले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये त्याची चांगलीच क्रेझ होती. तरुणच नव्हे तर तरुणीही हुक्‍क्‍याच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. हुक्‍क्‍याचे साहित्याची ऑनलाइनही विक्री होते. हुक्‍क्‍याच्या धुरामुळे अनेकांच्या आयुष्याचे नुकसान झाले. हुक्‍क्‍यात ड्रग्स, गांजासारखे नशेचे पदार्थ मिसळवले जात असल्याने अनेक जण व्यसनी झाले. या सर्वाला आता चाप बसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com