आईचा पेपर... अन्‌ बापाची परीक्षा...

आईचा पेपर... अन्‌ बापाची परीक्षा...

आष्टा -  दहावी आणि बारावीची परीक्षा म्हणजे करिअरची कवाडं खुली होणारा टप्पा. ही परीक्षा जवळ येईल तसं तणाव वाढतच जातो. पाल्याबरोबर किंबहुना त्याहून कैक पटीने अधिक टेंशन बापाला असतं. परीक्षेदिवशी हा ताण सर्वाधिक उंची गाठतो. खाण्या-पिण्यापासून ते केंद्रावर सोडणे, आणणे सर्वच कामे बापाला करावी लागतात. कुणी मुलासाठी, तर कुणी मुलींसाठी. आज मात्र पत्नीच्या पेपरसाठी पतीचा आणि मुलींसाठी बापाचा वेगळाच राबता अनुभवायला मिळाला. 

अंकलखोपचं हे कुटुंब. पत्नी बारावीला. पदरी दोन मुली. दीड वर्षाची स्वरा आणि चार महिन्यांची प्रांजल. त्याचं शिक्षण अवघं दहावी. अपुऱ्या शिक्षणामुळं त्याच्या नशिबी शेतमजुरी आलीय. त्याच्या तुटपुंज्या कमाईत प्रपंच सावरताना त्याची होणारी कसरत पाहून तिनं शिकायचं ठरवलं. शिक्षणाअभावी नोकरी नसल्यानं त्यालाही आता शिक्षणाचं महत्त्व उमगलंय. म्हणूनच आपण शिकलो नाही पण बायकोनं शिकावं ही त्याच्या अंतरीची इच्छा. परीक्षेच्या अभ्यासाच्या व्यापात ती व्यस्त असताना त्यानं अनेकदा आईची भूमिका निभावली. शेतमजुरी सांभाळून घरकाम आणि चिल्यापिल्यांची काळजी घेत पत्नीला अभ्यासाला मोकळीक दिली. पत्नीची शिकण्याची उमेद आणि त्याला पतीची साथ यातून हे दांपत्य आज परीक्षा द्यायला येथील केंद्रावर आलं होतं. 

आष्ट्यात आल्यावर त्यानं पत्नीला परीक्षा केंद्रावर सोडलं. तीन तास पोरींना सांभाळण्याचं काम त्याच्याकडं होतं. इथेही त्यानं आईची भूमिका चांगलीच वठवली. पाठीला गाठोडं मारून येथील काशिलिंग बिरोबा मंदिर गाठलं. आईप्रमाणे दोघींना छातीशी बिलगून घेतलं. आणलेल्या डब्यातले घास भरवले. पाणी पाजलं. प्रांजलला बाटलीतून दूध पाजलं. बायकोची परीक्षा संपेपर्यंत त्याला या भूमिकेत रहावं लागणार आहे. आईचा पेपर..अन्‌ बापाची परीक्षा अधोरेखित करणारा हा प्रसंग त्या कुटुंबाच्या भविष्याच्या सुखासाठीचा संघर्ष आणि नव्यानिर्मितीच्या नव्या स्वप्नांना बळ देणारा असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com