जैवविविधतेवरील संकटामुळे मानवी जीवन धोक्यात!
सोलापूर : सोलापूर परिसरातील माळरानावर हमखास दिसणारा धाविक पक्षी आता सहज दिसेनासा झाला आहे. लांगड्यांची संख्याही कमी होत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे जैवविविधतेवरील संकट वाढत असून पर्यायाने मानवी जीवन धोक्यात येणार असल्याचे मत पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
सोलापूर : सोलापूर परिसरातील माळरानावर हमखास दिसणारा धाविक पक्षी आता सहज दिसेनासा झाला आहे. लांगड्यांची संख्याही कमी होत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे जैवविविधतेवरील संकट वाढत असून पर्यायाने मानवी जीवन धोक्यात येणार असल्याचे मत पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात माळरान आहे. माळरानावर कुठली जैवविविधता असणार? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या पडतो. मात्र माळरानावर मोठ्या वेगवेगळ्या प्रकाराची जैवविविधता आढळते. या गवताळ भागावर धावीक, पखुर्डी याचे दोन प्रकार आढळतात. विविध प्रकारचे लार्क पक्षी, माळ टिटवी, नाकतोडे, किडे, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी, खोकड, लांडगा, कोल्हा, रानबोका, बेडूक असे कितीतरी विविध पशुपक्षी आणि अनेक परदेशी शिकारी पक्षी या गवताळ भागावर आढळून येतात.
गेल्या काही वर्षांपासून या जैवविविधतेचा र्हास होत आहे. याची कारणे अनेक आहेत. पाऊस कमी, गवताळ भागात लागणारी आगी, लोकसंख्या वाढ यामुळे सोलापूरपासून जवळपास 10 ते 15 किलोमीटर परिसरातील माळरानावर आता प्लॉटिंग होत आहे. याठिकाणच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या काही वर्षांच्या अभ्यासामध्ये आणि निरीक्षणात धावीक पक्षी, पखुर्डी आणि लांडगा यांची संख्या अतिशय कमी झाल्याचे दिसून आले आहे. नान्नज आणि गंगेवाडी येथे भरपूर प्रमाणात तसेच माळरानावर हमखास दिसणारा धावीक आज सहज पाहावयास मिळत नाही. जर याचे वेळीच संवर्धन झाले नाही तर ही जैवविविधता कायमची नष्ट होईल अशी भीती पर्यावरण अभ्यासक शिवानंद हिरेमठ यांनी व्यक्त केली आहे.
जैवविविधता नष्ट होण्यामागचे कारण सांगताना पर्यावरण अभ्यासक संतोष धाकपाडे म्हणाले, 'औद्योगिकरणामुळे झपाट्याने नैसर्गिक अधिवासात घट होत आहे. माळरानावरील झाडे, झुडपे, वेली टिकून राहिली तरच कीटक, पक्षी आणि प्राण्यांच्या संख्येत वाढ होईल आणि आपली जैवविविधता टिकून राहील. जैवविविधता टिकून राहण्यासाठी आपल्याला कसून प्रयत्न करावे लागणार आहेत.'
'मानवाच्या स्वैर वर्तनाने पर्यावरणात अनियमितता निर्माण झाली आहे. याचा फटका जैववेविध्येला बसतो आहे. प्रदूषण व वृक्षतोड या कारणांमुळे वन्यप्राणी, पक्षी व कीटकांसह अनेक जैववैविध्य विनाशाच्या कडेला पोचत आहेत. अनेक प्राणी व पक्षी नामशेष होत चालले आहेत. या जैववैविध्यांचे र्हास असाच होत राहीला तर परिसंस्थेतील अन्नसाखळीत खंड पडेल. पर्यायाने मानवी जीवन धोक्यात येईल' असे अभ्यासपूर्ण मत ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी व्यक्त केले.
जैवविविधतेचा र्हास होण्यास आपण सर्वजण जबाबदार आहोत. अलीकडच्या काळात रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी माळरानावर, झाडा-झुडपांमध्ये पार्टी करणे, तिथेच स्वयंपाक करण्याचे प्रकार होत आहेत. पार्टीनंतर सर्व कचरा तिथेच फेकून दिला जात आहे. हे थांबायला हवे.
- शिवानंद हिरेमठ, पर्यावरण अभ्यासक