शेतकऱ्यांना दीड कोटीची औजारे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

कऱ्हाड - मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने अलीकडे शेतकऱ्यांनी औजारे वापरून शेतीची मशागत करण्याची सवय लावून घेतली आहे. त्यांच्या या उपक्रमाला शासनाच्या कृषी विभागानेही पाठबळ देण्यासाठी अनुदानावर औजारे वाटपाची मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यात कऱ्हाड तालुक्‍यात शेतकऱ्यांना सुमारे दीड कोटीची औजारे वाटप करण्यात आली आहे. 

कऱ्हाड - मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने अलीकडे शेतकऱ्यांनी औजारे वापरून शेतीची मशागत करण्याची सवय लावून घेतली आहे. त्यांच्या या उपक्रमाला शासनाच्या कृषी विभागानेही पाठबळ देण्यासाठी अनुदानावर औजारे वाटपाची मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यात कऱ्हाड तालुक्‍यात शेतकऱ्यांना सुमारे दीड कोटीची औजारे वाटप करण्यात आली आहे. 

शेतीचे क्षेत्र वाढत्या नागरिकीकरणामुळे कमी होऊ लागले आहे. त्यातच पूर्वीसारखी कष्ट करण्याची मानसिकता कमी होत असल्याने मजुरीच्या कामावर फारसे कोणी जाताना दिसत नाही. त्यामुळे सध्या शेती कामासाठी मजूर कमी झाले आहेत. जे मजूर उपलब्ध आहेत, त्यांना शेतात नेण्यासाठी व परत आणण्यासाठी वाहनांची सोय करावी लागते. त्याचबरोबर मजुरीही ३०० ते ४०० रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे त्यांची मजुरी सर्वसामान्य शेतकऱ्यांना न परवडणारी झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांनी छोटी- छोटी औजारे घेऊन त्याद्वारे स्वतःच किंवा अन्य काही शेतकरी मदतीला घेऊन शेतीतील मशागतीची कामे सुरू केली आहेत. त्यातून वेळेत आणि कमी पैशात मशागत करणे शक्‍य होऊ लागले आहे. शेतकऱ्यांची औजारांची गरज ओळखून कृषी विभागाने औजारे खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण अभियान राबवण्यात येत आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना काही औजारे ५० टक्के अनुदानावर, तर मोठी औजारे किमतीच्या प्रमाणात अनुदान देऊन खरेदी करण्यासाठी आर्थिक हातभार लावला जात आहे. संबंधित औजारे वाटपात  कऱ्हाड तालुक्‍यातील कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना थेट शेतकऱ्यांपर्यंत जाऊन काम केल्याने जिल्ह्यात सर्वाधिक औजारे कऱ्हाड तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मिळाली आहेत. सुमारे दीड कोटी रुपये अनुदानाचा लाभ तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. 

अशा योजना... अशी औजारे!
राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण अभियान, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनांतर्गत कृषी विभागामार्फत ट्रॅक्‍टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, पलटी नांगर, मळणी मशिन, फवारणी पंप, कडबाकुट्टी, विद्युत पंप, पेरणी यंत्र आदी प्रकारची औजारे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आहेत. 

शेतीतील मशागतीची मजुरी आवाक्‍याबाहेर गेली आहे. कृषी विभागाने अनुदानावर औजारे दिल्याने शेतीच्या मशागतीची काळजी मिटली आहे. माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना औजारांचा लाभ झाला आहे. कमी काळात चांगली मशागत होत आहे, याचे समाधान वाटते.

- पांडुरंग चव्हाण, शेतकरी, तांबवे

Web Title: Hundreds of tools to farmers