लष्कराच्या केके रेंजवर या कारणाने गेला शेकडोंचा बळी! 

दत्ता इंगळे 
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

नगरजवळील विळद, खारेकर्जुने या नगर तालुक्‍यातील गावांलगत संरक्षण दलाचे के. के. रेंज हे युद्धसराव क्षेत्र आहे. या ठिकाणी सैनिक सराव करताना मोठ्या प्रमाणात दारूगोळा, छोटी-मोठी क्षेपणास्त्रे वापरतात. निकामी न झालेली काही क्षेपणास्त्रे, दारूगोळा व भंगार गोळा करण्याचे काम काही ठेकेदारांमार्फत होते. मात्र,

नगर तालुका ः लष्कराच्या के. के. रेंज युद्धसराव क्षेत्राच्या हद्दीत गेल्या कित्येक वर्षांपासून शेकडो जण भंगार गोळा करून उपजीविका करतात. मात्र, तेच भंगार त्यांच्या जिवावर बेतते. आतापर्यंत शेकडो गावकऱ्यांना जीव गमवावा लागला. काहींच्या मते हा आकडा सातशेच्या घरात आहे. एकंदरीत युद्धातील सैनिकांच्या मृत्यूपेक्षा जास्त संख्या आहे. काल सकाळी 55 वर्षीय एका व्यक्तीचा बॉम्बगोळा फोडताना स्फोट होऊन मृत्यू झाला. 

कुठे आहे केके रेंज

नगरजवळील विळद, खारेकर्जुने या नगर तालुक्‍यातील गावांलगत संरक्षण दलाचे के. के. रेंज हे युद्धसराव क्षेत्र आहे. या ठिकाणी सैनिक सराव करताना मोठ्या प्रमाणात दारूगोळा, छोटी-मोठी क्षेपणास्त्रे वापरतात. निकामी न झालेली काही क्षेपणास्त्रे, दारूगोळा व भंगार गोळा करण्याचे काम काही ठेकेदारांमार्फत होते. मात्र, या ठेकेदारांची व संरक्षण दलाच्या जवानांची नजर चुकवून अनेक जण भंगारचोरीच्या उद्देशाने या क्षेत्रात घुसतात. 

 

kk range

केके रेंजवरील बॉम्ब गोळा चोरून त्यातील पदार्थ काढताना खारे कर्जुनेतील गावकऱ्याच स्फोटात मृत्यू झाला. त्यावेळी लष्कराचे अधिकारी व पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

 

बॉम्ब गोळे चोरतात

या बाबत ग्रामस्थांशी चर्चा केली असता, नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले, की आतापर्यंत फक्त खारेकर्जुनेतील सातशेपेक्षा अधिक जणांचा अशा घटनांमध्ये मृत्यू झाला. के. के. रेंजचा सराव सुरू झाल्यापासून तर दोन ते तीन महिन्यांनी एखादी घटना घडतेच. गावापासून दीड किलोमीटरवर असलेल्या के. के. रेंज या माळरानावर सापडलेले भंगार, क्षेपणास्त्रे आणून त्यातील स्फोटक पदार्थ काढण्याचा प्रयत्न लोक करतात. त्यात अपघात होऊन जीव गमावतात, काही जायबंदी होतात. अशा अनेक घटना घडूनही असे प्रकार थांबत नाहीत. 

...म्हणून सोयरिकी जुळत नाहीत 
ग्रामस्थ म्हणाले, की गावात वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे जवळचे सगे-सोयरे, नातेवाईक आपली मुलगी या गावात द्यायला धजावत नाहीत. यामुळे आम्हाला लांब जाऊन मुलीचे वा मुलाचे लग्न जमवावे लागते. 

काही चोरांचे नातेवाईक ठेकेदाराकडे 
के. के. रेंजमधील भंगार व अन्य साहित्य गोळा करण्यासाठी माणसे नेमली जातात. यात काही जण या चोरीच्या मार्गाने भंगार गोळा करणाऱ्यांचे नातेवाईकही असतात. ठेकेदार व संरक्षण दलाच्या जवानांनी कारवाई करण्याचे ठरविले, तरी त्याची खबर भंगारचोरांना आधीच मिळते. त्यामुळे कारवाईआधीच ते पसार होतात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundreds of victims went to the KK range for this reason