राष्ट्रवादीचे लाक्षणिक उपोषण अवघ्या दीड तासांचे!

धर्मवीर पाटील
सोमवार, 9 जुलै 2018

इस्लामपूर - शासनाच्या आयएचएचएल योजनेअंतर्गत वैयक्तिक व घरगुती शौचालय अनुदान मिळावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले उपोषण प्रशासनाने अवघ्या दीड तासात गुंडाळले! मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी उपोषण सुरू होताच घटनास्थळी भेट देऊन आजच्या आज लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करत असल्याचे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीने उपोषण आवरते घेतले. यामुळे प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यातील विस्कटलेपण समोर आले.

शौचालय योजनेचे थकलेले अनुदान मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज लाक्षणिक उपोषण आयोजित केले होते. शहरातील सुमारे ६०० लाभार्थ्यांना गेले दीड वर्षे हे अनुदान मिळालेले नसल्याचा राष्ट्रवादीचा आरोप होता. परंतु छाननी केल्याशिवाय हे अनुदान जमा करता येणे शक्य नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते. मागील आठवड्यात राष्ट्रवादीने निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिल्यावर प्रशासनाने वेगाने अनुदान जमा करण्याची प्रक्रिया राबविली; मात्र दोघांमध्ये ताळमेळ नसल्याने आज राष्ट्रवादीने पालिकेच्या गेटवर उपोषण केलेच. अजून उपोषणाच्या ठिकाणी कार्यकर्ते जमत होते तोवरच उपोषण मागे घेण्यात आले. काहींची जुजबी भाषणे वगळता उपोषण म्हणजे निव्वळ फार्स ठरला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, बाळासाहेब पाटील, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, नगरसेवक विश्वनाथ डांगे, बशीर मुल्ला, आनंदराव मलगुंडे,  विशाल सूर्यवंशी, सदानंद पाटील, आदी उपस्थित होते.

"दाखल झालेल्या अर्जाची छाननी करण्यात वेळ गेल्याने अनुदान जमा करण्यास विलंब लागला. दोन दिवसात लाभार्थ्यांना अनुदान मिळण्याची व्यवस्था केली आहे."
-मुख्याधिकारी दीपक झिंजाड.
 
दृष्टीक्षेपात योजना आणि अनुदान.
जुने लाभार्थी ६८०.
नवे अर्ज : सुमारे ६००.
अनुदानाची एकूण रक्कम : ७८ लाख ८४ हजार.
अनुदानाची रक्कम : प्रत्येकी १४५००.
अनुदान मिळणार : ३३३ जणांना.
दुबार अर्जाची शक्यता : अंदाजे २० ते २५.

Web Title: hunger strike of NCP only for one and a half hours