शिकारी पक्षी पहायचेत... चला, मग 'इथे' भेट द्या! 

शशिकांत कडबाने
रविवार, 8 डिसेंबर 2019

अनेक घटकांचे अस्तित्व 
माळशिरस तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील ओसाड परिसर या वर्षी बरसलेल्या परतीच्या पावसामुळे मुबलक गवत व कुसळे याने अच्छादित झाला आहे. यामुळे या परिसरात पर्यावरणातील अन्नसाखळीतील अनेक घटक आनंदाने आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्यामुळेच पर्यावरण अभ्यासकांना हा परिसर आकर्षित करत आहे. 
- डॉ. अरविंद कुंभार, पक्षी व पर्यावरण अभ्यासक, अकलूज

अकलूज (जि. सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यात सततचा दुष्काळ तर यंदा परतीच्या पावसामुळे ओला दुष्काळ असल्याचे चित्र आहे. सतत बदलते हवामान आणि निर्सगाच्या अवकृपेने तालुक्‍यातील सर्वच पिके वाया गेली आहे. असे असले तरी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात यंदा परतीच्या पावसाच्या कृपेमुळे वन्यप्राणी व पक्ष्यांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील ओसाड पर्वत रांगेतील गवताळ प्रदेशात यंदा शिकारी पक्ष्यांचा वावर चांगलाच वाढला आहे. 

Image may contain: bird and sky

माळशिरस तालुक्‍यात यंदा हिरवे गवत व कुसळीने व्यापलेल्या खुल्या माळरानांवर टोळ, पावसाळी किडे, फुलपाखरे व इतर किटकांसह त्यांच्या आळ्या, सरीसर्प व ससे, कोल्हे या वन्यप्राण्यांना उत्तम अधिवास तयार झाले आहे. किटकांवर उदरनिर्वाह करणाऱ्या छोट्या किटकभक्षक पक्ष्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या कारणांमुळे माळरानाच्या वैभवाचे प्रतिक असलेल्या शिकारी पक्ष्यांना हा परिसर पर्वणी ठरला आहे. साप व सरडे या सारखे सरपटी प्राणी व उंदीर, चिचुंद्री, ससे व काही प्रमाणात कोल्हे हे प्राणी शिकारी पक्ष्यांचे सावज ठरतात. घारींपैकी कापशी घार, काळी घार (चचाण), गरूडांपैकी काळा, पिंगट व पांगुळ गरूड, ससाणातील बहिरी ससाणा व नारझिनट ससाणा (इंडियन केस्ट्रल) व सरडा (पारवा) बाज या शिकाऱ्यांनी सध्या विस्तृत माळरानांवर आपली अस्तित्व दाखवून दिले आहे. हे पक्षी दिवसभर भक्ष्य बळकावण्यासाठी गगनभरारी मारत असतात. 

Image may contain: bird, grass, outdoor and nature

दुपारच्या वेळी डोंगरदऱ्यांच्या खडकाळ कडांवर विश्रांती घेत असताना दिसतात तर सकाळी व सायंकाळच्या वेळी सावज टिपण्यासाठी सक्रीय बनतात. जमिनीवरील गवत व खुरट्या झाडाझुडुपांच्या आडोशाला लपून बसलेल्या भक्ष्यांना टिपण्यासाठी काही शिकारी पक्षी जमीन स्कॅन करतात. विशेष करून बहिरी ससाणे व कापशी घारी जमीन स्कॅन करतानाचे दृश्‍य विलोभनीय असते. हे बळकट पक्षी सावज शोधताना जमिनीपासून सुमारे तीस ते चाळीस मीटर उंचावर हवेत काही मिनिटे एकाच ठिकाणी पंख फडफडत स्थिर राहून आपली तीक्ष्ण नजर चोहीकडे फिरवत राहतात. भक्ष्य दिसले की बाणाच्या वेगाने जमिनीवर सूर मारून त्याला पकडून इच्छित स्थळी बसून फस्त करतात. 

Image may contain: outdoor

शिकारी पक्ष्यांच्या वावरामुळे निसर्गप्रेमी व ज्येष्ट पक्षी निरीक्षक डॉ. अरविंद कुंभार यांनी विशाल हिंगणे, डॉ. श्रीकांत कुलकर्णी व प्रा. प्रकाश धाईंजे या सहकाऱ्यांबरोबर या परिसरात नुकतीच निसर्ग भ्रमंती केली. डॉ. कुंभार यांनी विविध प्रकारचे ससाणे, घारी, गरुड, भोवत्या, शिकऱ्या, खाटिक, बाज इत्यादी शिकारी पक्षी वावरताना दिसले. तालुक्‍यातील सुळकाई डोंगर, गारवाड, गोरडवाडी परिसरात भ्रमंती करण्यासाठी पक्षी अभ्यासक व पर्यटक येऊ लागले असल्याचे त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hunters want to see the birds... Come on then visit