नवऱ्यानं टाकलं, हीरोंनी हाकललं... माऊलीनं स्वीकारलं

The husband gave up, Moulin accepted
The husband gave up, Moulin accepted

नगर तालुकाः मुलीच्या हृदयाला छिद्र असल्याचे कळताच दारूडा नवरा परागंदा झाला. तीन मुलांसह ती ओली बाळंतीण जाणार कुठे? मदत करणार कोण? शेजारी-पाजाऱ्यांची तिच्यावेगळी स्थिती नव्हती. गोरगरिबांच्या मदतीला हीरो धावून येतात, हे तिनं चित्रपटांत पाहिलं होतं, म्हणून ती सलमान खानच्या दारावर गेली. वॉचमनने काहीच न ऐकता तिला हाकलून लावलं, नंतर गोविंदाच्या दारात जाऊन बसली. त्याने तीन हजार रुपये टेकवले. एवढ्या पैशात ते लटांबर कशी सांभाळणार? पुढं व्हायचं तेच झालं... 

कर्नाटकातील नयना नावाच्या (वय 24) तरुणीची ही करुण कहाणी आहे. एवढ्या कमी वयात तिच्या नवऱ्याने तीन बाळंतपणं तिच्यावर लादली. तिला तिसरी मुलगी झाली. त्यामुळे दारूडा पती रोज मारायचा. ती बिचारी दिवसभर फिरून कचऱ्यातील प्लॅस्टिक जमा करून नवऱ्यासह मुला-बाळांचं पोट भरायची. परंतु तिची परीक्षा अद्यापि संपलेली नव्हती. मधल्या मुलीच्या हृदयाला छिद्र असल्याचं डॉक्‍टरांनी सांगितलं. जगायचीच पंचाईत, मग हृदय शस्त्रक्रिया करणार कशी? या विचाराने तिच्या नवऱ्याच्या डोक्‍यात तिडीक गेली. एकेदिवशी तो मुली आणि बायकोला सोडून कुठेतरी निघून गेला. त्या वेळी ती नऊ महिन्यांची गरोदर होती. 


नयना त्याही स्थितीत खंबीर राहिली. मुलीला जन्म दिल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत ती पालाबाहेर पडली. कुणीतरी तिला सांगितलं, अभिनेता सलमान खान अशा गरजूंना मदत करतो. ती तीन मुलं व एका लहान बहिणीसह रेल्वेने मुंबईत आली. सलमान खान कुठे राहतो, हे माहिती असण्याचं कारणच नव्हतं. एका रिक्षावाल्याच्या मदतीने सलमानच्या घरी पोचली. भेटण्यासाठी दोन दिवस रांगेत थांबली. नंतर तेथील रखवालदाराने तिला बाहेर हाकललं. मदत तर सोडाच, कुणी खायलाही देईना. 

लहानपणी गोविंदाचे चित्रपट तिला फार आवडायचे. आशेचा किरण दिसू लागला. अशाच कोणाच्या तरी मदतीनं 
तिनं गोविंदाचं घर गाठलं. तिथेही दोन दिवस गेले. गोविंदांना तिने आपली कहाणी सांगितली. गोविंदानेही खिशातील तीन हजार रुपये हातावर टेकवत मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. पुढे काय करायचं हा यक्षप्रश्‍न तिच्यासमोर होता. या विवंचनेत ती तीन दिवस रेल्वेस्थानकावर बसून राहिली. शासकीय रुग्णालयाचा पत्ता सापडत नव्हता. सर्व मार्ग खुंटलेले... 
असं वाटत असलं, तरी एक मार्ग असतोच असतो. हर्षल भोर्डे यांच्या कानावर नयनाची कहाणी गेली. त्यांनी लगेचच नगर जिल्ह्यातील शिंगवे येथील माऊली प्रतिष्ठानच्या मनगाव प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र धामणे यांच्याशी संपर्क केला. या प्रकल्पात मनोविकलांग, बेवारस महिलांचा सांभाळ केला जातो. सध्या तिथे सुमारे दोनशे महिला व वीस बेवारस मुले आहेत. डॉ. धामणे यांनी तिला माऊलीत दाखल करून घेतलं. नयनाची मुलं आणि बहीण गेल्या दोन दिवसांपासून माऊलीत स्थिरावलीत. 

"माऊली'त मिळाला मायेचा आधार 

माऊलीत मायेचा आधार मिळाल्याने नयनाच्या डोळ्यांत आनंदी भविष्याची स्वप्न तरळू लागलीत. मुलींना खूप शिकवायचं म्हणतेय. डॉक्‍टर बनवण्याचं स्वप्न पाहतेय. डॉक्‍टर झाल्यावर अशी कोणावर वेळ येणार नाही, अशी तिची भाबडी समजूत आहे. मुलीच्या हृदयाचं छिद्र बुजवले जाईल, याची तिला डॉ. धामणेंमुळे खात्री वाटायला लागलीय. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com