चालत्या रेल्वेतून पत्नीला ढकलले; पुन्ही खाली उडी मारून दगडाने ठेचले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

कर्नाटक एक्‍स्प्रेस या रेल्वेने प्रवास करणाऱ्या पतीने पत्नीला धावत्या गाडीतून खाली ढकलून स्वतः गाडीतून खाली उडी मारली. खाली पडल्यानंतर पतीने पत्नीला दगडाने ठेचून ठार मारले. 

कुर्डुवाडी - कर्नाटक एक्‍स्प्रेस या रेल्वेने प्रवास करणाऱ्या पतीने पत्नीला धावत्या गाडीतून खाली ढकलून स्वतः गाडीतून खाली उडी मारली. खाली पडल्यानंतर पतीने पत्नीला दगडाने ठेचून ठार मारले. 

ही घटना मंगळवारी (ता. 17) सकाळी साडेनऊ ते दुपारी एकच्या दरम्यान भाळवणी व जेऊर रेल्वे स्थानक दरम्यान घडली. मनीषा सुनील प्रजापती (वय 19, रा. एकलोद, ता. बिजापूर, मध्य प्रदेश) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. पती सुनील रामपाल प्रजापती (वय 21) याला कुर्डुवाडी रेल्वे पोलिसांनी अटक करून दौंड रेल्वे न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. 

रेल्वे पोलिस उपनिरीक्षक दिलीप जमादार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रजापती व त्याचे कुटुंबीय या रेल्वेने प्रवास करत होते. भाळवणी ते जेऊर दरम्यान गाडीचा वेग कमी झाला. सुनीलने पत्नीला गाडीतून खाली ढकलले व स्वतः उडी मारली. यात तो स्वतः जखमी झाला. पत्नीच्या डोक्‍यावर दगडाने मारून तिला ठार केले. रेल्वे पोलिसांना रेल्वे सुरक्षा बलाच्या कंट्रोलकडून याबाबत माहिती मिळाली. पोलिस उपनिरीक्षक महादेव दरेकर व त्यांचे पथक घटनास्थळी गेले. तेथे संशयित आरोपी सुनील हा ओरडत होता. त्याच्या भोवती माणसे होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता "मेरी औरतने मुझे धोखा दिया है, मैंने इसे मार डाला है' असे त्याने सांगितले. तपास पोलिस उपनिरीक्षक महादेव दरेकर करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband killed his wife in solapur