80 वर्षांचा तरुणाबराेबर मीही लढणार : बाळासाहेब भिलारे

Balasaheb Bhilare
Balasaheb Bhilare

भिलार (जि. सातारा) : आबा मी म्हंटलं होतं, की या निवडणुकीनंतर मी निवृत्त होणार; पण हा निर्णय मी आता परत घेतोय. 80 वर्षांचा शरद पवारांसारखा तरुण अजूनही मैदान गाजवत असताना आपण निवृत्ती घेणं बरोबर नाही. तुमच्या पाठीशी राहून राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे यांनी सांगितले. 

श्री. भिलारे यांच्या वाढदिवसानिमित्त वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांनी भिलार येथे जाऊन त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. त्यावेळी भिलारे यांनी उपस्थितांसमाेर आपल्या भावना व्यक्त केल्या. 

खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या निधनानंतरची मकरंद पाटील यांची पहिलीच निवडणूक. त्यामुळे त्यांना तात्यांची कमतरता भासणे क्रमप्राप्तच होते. आजवरच्या राजकीय वाटचालीत कार्यकर्ते, मतदारांच्या खंबीर पाठिंब्याबरोबरच तात्यांचा पाठीवरील हात, आशीर्वाद, मार्गदर्शनावरच त्यांनी सर्व लढाया लीलया जिंकल्या; परंतु तात्यांविना निवडणूक लढण्याची ही पहिलीच वेळ असताना त्यांच्यापुढे विरोधकांनीही चक्रव्यूह निर्मिला; पण त्याच वेळी रामरूपी बाळासाहेब भिलारे यांनी मात्र मकरंद पाटील यांच्यावर नेहमीप्रमाणे मायेचे छत्र धरले.

केवळ धीराचाच नव्हे तर खंबीरतेचा हात दिला आणि उभे केले मताधिक्‍याचे पाठबळ. त्यामुळे मकरंद पाटील यांनी विजयाची हॅटट्रिक साधली. आज त्याच रामाच्या भेटीने मकरंद आबांना गहिवरून आले.

राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर (कै.) लक्ष्मणराव पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून जिल्ह्यात राष्ट्रवादीची पाळेमुळे खोल रुजवण्यात बाळासाहेब भिलारे यांचेही नाव अग्रक्रमाने घेतले जाते. तात्यांनाही प्रत्येकवेळी दादांनी नेहमी पाठिंबा दिला. त्यानंतर आबांच्या दोन्ही निवडणुकीत दादांनी महाबळेश्वर तालुका एकसंधपणे आबांच्या पाठीशी ठेवला. या निवडणुकीत चित्र वेगळे असतानाही दादांनी महाबळेश्‍वर तालुक्‍याचे उच्चांकी मतदान आबांच्या पदरात टाकले. त्यामुळे या भेटीत एकीकडे होता कृतज्ञतेचा भाव, तर दुसरीकडे होती धीरोदात्तपणाने साथ देण्याची हमी... ती पाहून उपस्थितही काहीसे हेलावून गेले आणि राजकीय धुरिणांमधील माणूसधर्मही कसा जागा असतो, याचीच चर्चा सुरू राहिली.
 
या भेटीत भिलारे म्हणाले आबा मी म्हंटलं होतं, की या निवडणुकीनंतर मी निवृत्त होणार; पण हा निर्णय मी आता परत घेतोय. 80 वर्षांचा शरद पवारांसारखा तरुण अजूनही मैदान गाजवत असताना आपण निवृत्ती घेणं बरोबर नाही. तुमच्या पाठीशी राहून राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत करण्याचा प्रयत्न करेन. भिलारे यांच्या वक्तव्यानंतर सर्वांनीच जल्लोष केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com