
सांगलीतील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या मागील अहिल्यानगर हद्दीतील शिवारात शक्तीमान भेटला. त्याची जीवनकहाणी म्हणजे दैन्य दारिद्रयाचा पिढ्यांचा अंधार संपवण्यासाठी शिक्षणाच्या वाटेने निघालेल्या अनेकांची प्रातिनिधिक अशीच आहे.
सांगली ः माझे आजा-पंजाही ऊसतोडीसाठी गाव सोडायचे. आज मला गावच नव्हे तर शिक्षणही अर्ध्यावर सोडावे लागतेय. पण माझी जिद्द कायम आहे. मी वकील होणार..होणारच. अशा आत्मविश्वास शक्तीमान पावले यांच्या तोंडातून व्यक्त झाला तेव्हा आनंद आणि खंत अशा दोन्ही भावना मनात दाटून आल्या होत्या. सांगलीतील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या मागील अहिल्यानगर हद्दीतील शिवारात शक्तीमान भेटला. त्याची जीवनकहाणी म्हणजे दैन्य दारिद्रयाचा पिढ्यांचा अंधार संपवण्यासाठी शिक्षणाच्या वाटेने निघालेल्या अनेकांची प्रातिनिधिक अशीच आहे. सहज चौकशी केली आणि त्याने आपला जीवनपटच मांडला.
बीड जिल्ह्यातील बेंगळवाडी हे माझं गाव. ऊसतोडीसाठी आई वडिल राज्यभरात फिरायचे. त्यामुळे त्यांच्यासोबतच चौथ्या वर्षीच मी कोयता हाती घेतला. आजही तो कोयता हाती आहे आणि लेखणीही. शक्तीमानने आपला आयुष्याचा पट अलगड उलगडला. म्हणाला,"" दरवर्षी हंगामी ऊसतोड आणि पुन्हा शिक्षण असे करत दहावीपर्यंत मजल मारली. वडीलांनी मला सतत बळ दिले.
दहावीत 82 टक्के तर बारावी विज्ञान शाखेत 78 टक्के गुणांनी उत्तीर्ण झालो. मग काही दिवस आर्मीत जायचे मनात होते. पण उंची कमी पडली. काही दिवस राजकारणाचेही वेड होते. मात्र त्यानं पोट भरणार नाही हे लवकरच कळलं. आपल्याला शिकले पाहिजे. आपल्या समाजासाठी न्याय देणारे काम केले पाहिजे असं वाटले आणि वकिल व्हायचं ठरवलं.''
शक्तीमान पुढे म्हणाला,"" एल.एल.बीासाठी बीडच्या स्वातंत्र्य सेनानी नाईक विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. प्रथम वर्षात 62 टक्के पडले. सध्या दुसऱ्या वर्षात शिकतोय. सध्या महाविद्यालयाला कोरोनाने टाळे लागले आहे. आईवडिलांसोबत मी आता इथे आलो आहे. महाविद्यालय सुरु होईल तेव्हा पुन्हा जाईन. इथेही वेळ काढून माझा अभ्यास सुरुच असतो.
मला वकिल होऊन ऊसतोड कामगारांसाठी काम करायचे आहे. त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाच्या व्यवस्था उभ्या करायच्या आहे. बीडमध्ये विद्यार्थी वसतीगृह सुरु करायचे आहे. अनेक योजना आहेत...मात्र मला त्याआधी वकील व्हायचे आहे. हातात कोयता आहे आणि लेखणी कधीही सुटणार नाही. फुले, शाहु, आंबेडकर यांनी पाहिलेली स्वप्ने आता प्रत्यक्षात येत आहेत. कितीही संकटे समोर आली तरी मी वकील होणारच..!''
संपादन : युवराज यादव