'तळे माझ्या मालकीचे, मी ठरवणार'

'तळे माझ्या मालकीचे, मी ठरवणार'

सातारा -  "मंगळवार तळे माझ्या मालकीचे आहे. तेथे काय करायचे, कसे करायचे हे मी ठरवणार. न्यायालयाच्या अवमानाचा प्रश्‍नच नाही येत. तळे माझे असल्याने वाटेल त्या परिस्थितीत मूर्ती विसर्जन तेथेच होणार,' असे सुनावत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज प्रशासनाला थेट आव्हान दिले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार असेल. पुण्यात "सनबर्न' फेस्टिव्हलच्या वेळी "आयजीं'ना डेसिबलची मर्यादा दिसली नाही का, असा सवालही त्यांनी केला. 

मोठ्या आवाजाच्या ध्वनिक्षेपकाच्या भिंतीना मर्यादित परवानगी देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविणार आहे, असेही त्यांनी आज पालिकेत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. साताऱ्यातील गणेश मूर्तींचे विसर्जन मंगळवार तळ्यात न करता शहराबाहेरील कण्हेर खाणीत आणि गोडोलीतील कृत्रिम तळ्यात करावे, अशा प्रशासनाच्या सूचना आहेत. या पार्श्‍वभूमीवर आज खासदार उदयनराजे यांनी पालिकेच्या सभागृहात शहरातील गणेश मंडळ कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी भूमिका स्पष्ट केली. जिल्ह्यातील विविध कारखान्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यांच्याकडे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नाहीत. प्रशासनाला हे दिसत नाही, असे सांगून उदयनराजे म्हणाले, ""ढोल- ताशांचा पण आवाज मोठा असतो. त्यावरही बंदी घालणार का? बेरोजगारांनी कर्ज काढून मोठी ध्वनियंत्रणा घेतली. त्यांचाही विचार झाला पाहिजे. पुण्यात सनबर्न फेस्टिव्हल झाला. त्या कार्यक्रमात विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांना डेसिबल दिसले नाहीत का?'' 

उदयनराजे म्हणाले... 

* जिल्हा प्रशासनाने विनाकारण विसर्जनाचा गोंधळ घातला 
* विसर्जन मिरवणुकीचा मार्ग हे कोण ठरवणार? 
* न्यायालयीन निर्णयाचे स्वार्थासाठी अर्थ काढले गेले 
* 40 वर्षे सत्ता असणाऱ्यांनी विसर्जन व्यवस्था का नाही केली? 

कृत्रिम तळे बांधणार 
साताऱ्यातील मूर्ती विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर आज पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी येथे जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी आतापर्यंतच्या कार्यवाहीचा आढावा घेतला. कण्हेर, तसेच गोडोली तलाव हे पालिका हद्दीबाहेर असल्याचे पालिका प्रशासनाने त्यांच्या निदर्शनास आणले. त्यावर शहराबाहेर मूर्ती नेण्यापेक्षा शहरातच पर्यायी कृत्रिम तळे तयार करण्याचे निर्देश म्हैसेकर यांनी दिले. बुधवार नाक्‍याजवळ जिल्हा परिषदेच्या जागेत कृत्रिम तळे खोदण्याचे ठरले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com