माझं वाटोळं झालं, आता मुलांना शिकविणारच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

कोल्हापूर : ''आमचा अन्‌ शाळेचा कधीच संबंध आला नाही, नवरा व्यसनात वाया गेला, खुनाच्या गुन्ह्यात मी अडकले, माझी पोरं उघड्यावर पडली. आता बस्स, जेलातून बाहेर पडल्यावर शेतात काम करणार. पोरास्नी शिकविणार अन्‌ मोठं ऑफिसर केल्याशिवाय गप्प बसणार नाय, माझं वाटोळं झालं, आता मुलांचं होऊ देणार नाही,'' अशा भावना व्यक्त करीत बंदीमाता वासंती हिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. निमित्त होतं, मध्यवर्ती कळंबा कारागृहातील बंदीजन व त्यांच्या मुलांच्या गळाभेटीच्या उपक्रमाचं. 

कोल्हापूर : ''आमचा अन्‌ शाळेचा कधीच संबंध आला नाही, नवरा व्यसनात वाया गेला, खुनाच्या गुन्ह्यात मी अडकले, माझी पोरं उघड्यावर पडली. आता बस्स, जेलातून बाहेर पडल्यावर शेतात काम करणार. पोरास्नी शिकविणार अन्‌ मोठं ऑफिसर केल्याशिवाय गप्प बसणार नाय, माझं वाटोळं झालं, आता मुलांचं होऊ देणार नाही,'' अशा भावना व्यक्त करीत बंदीमाता वासंती हिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. निमित्त होतं, मध्यवर्ती कळंबा कारागृहातील बंदीजन व त्यांच्या मुलांच्या गळाभेटीच्या उपक्रमाचं. 

गळाभेटीसाठी 251 बंदीजनांनी अर्ज केले होते. त्यात 2 ते 16 वयोगटातील सुमारे 400 मुले या उपक्रमात सहभागी होतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात 140 बंदीजनांशी 215 मुलांची गळाभेट झाली. कारागृह अधीक्षक शरद शेळके यांच्या पुढाकारातून आज हा चौथा उपक्रम होता. सकाळी दहाला उपक्रमाची सुरवात झाली. या वेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. ए. लवेकर, जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश उमेशचंद्र मोरे, पश्‍चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

मुलांच्या भेटीच्या ओढीने काल (ता. 20)पासून बंदीजनाच्या नजरा लागून राहिल्या होत्या. मुलांसाठी खाऊ घेऊन सकाळपासून त्यांची प्रतीक्षा सुरू होती. सकाळी आठपासून बंदीजनांची मुले कारागृहासमोर जमा झाली होती. त्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना आत सोडण्यात येत होते. कारागृहात गळाभेटीसाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात आला होता. त्याच्या बाजूला बंदीजन आत येणाऱ्या मुलांच्या घोळक्‍यातून अरे बाळा बंटी, चिंटू, सोन्या, राकेश, आशू... अशा हाका मारून जवळ बोलावून घेत होते. कित्येक दिवसांनंतर आई-वडिलांना पाहून मुले पळत जाऊन बिलगत होती.

Image may contain: 5 people, people smiling, people sitting and child

Image may contain: 12 people, people smiling, people sitting and child

Image may contain: 4 people, crowd

Image may contain: 7 people

मुलांना कडेवर घेऊन बंदीजन त्यांचा पापा घेत होते. हातातील खाऊ भरवत होते. घरातील आजी-आजोबांची विचारपूस, शाळेचा अभ्यास, निकालाची खबरबात बंदीजन मुलांकडून घेत होते. त्यानंतर एकाच ताटात भोजनाचा आस्वाद मुलांबरोबर बंदीजनांनी घेतला. 'बस्स, आता चमत्कार घडावा, घड्याळच बंद पडावे आणि हे क्षण संपूच नयेत' असे भाव बंदीजनांच्या चेहऱ्यावर दिसत होते. पण, अखेर उपक्रमाची वेळ संपली, बंदीजन आई-वडिलांचा हात सोडून मुलांची पावले कारागृहाच्या प्रवेशद्वाराकडे वळली, त्यांना काळजी घे, अभ्यास कर बाळाऽऽऽ अशा पाणावलेल्या डोळ्यांनी ओरडून सांगत बंदीजन निरोप देत होते. उपक्रमासाठी तुरुगांधिकारी हरिश्‍चंद्र जाधव, एस. एल. आडे, आर. एस. जाधव आदींनी सहकार्य केले. 

उपक्रमात सहभागी झालेल्या एका बंदीमातेने आपली कहाणी 'सकाळ'समोर कथित केली. देवगड परिसरातील राहणारी 55 वर्षांची वासंती निकम. अशिक्षित सामान्य कुटुंबात जन्मली. लहान वयातच लग्न झालं. नवरा मद्यपी निघाला. शेतात मोलमजुरी करून घर चालवायचं. तिला 11 मुले झाली. काही वर्षांपूर्वी मद्यपी पतीचा खून झाला. त्यात ती अडकली. तिला शिक्षा झाली. तसा तिचा संसार उघड्यावर पडला. सात लहान मुलांना अनाथाश्रमाचा आसरा मिळला. मात्र, चार मुलांना शेतमजुरीचा आधार घ्यावा लागला. एक मिनीटभर सोडून न राहणारी ही मुले तिच्या मायेला मुकली. मोठी चार मुले पत्र आणि मनिऑर्डर पाठवितात. मात्र, त्यांना भेटायला यायला परवडत नाही. लहान मुलांना कधी बघतो, असे झाले होते. पण, योग जुळून आला या गळाभेटीच्या उपक्रमातून. जीवनात शिक्षण किती महत्त्वाचे आहे, हे जीवनात आलेल्या कटू अनुभवातून जाणलंय. आता जेलातून बाहेर पडल्यानंतर शेतात राबून पोरांना शिकविणार, खूप मोठं करणार आणि सगळे मिळून राहणार असल्याचे तिने सांगत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 

गळाभेट उपक्रमाच्या माध्यमातून बंदीजन मुलांना भेटू लागले. त्यामुळे त्यांच्यात सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागला आहे. त्यांना कुटुंबासह समाजाविषयी प्रेम वाटू लागले आहे. त्यामुळे कारागृहातील वातावरण शांत व उत्साही बनले आहे. 
- शरद शेळके, कारागृह अधीक्षक

Web Title: I will teach my children says a prisoner in Kolhapur