चला, जोशपूर्ण मतदान करूया..!

चला, जोशपूर्ण मतदान करूया..!

कोल्हापूर - लोकशाही सक्षम आणि बळकट करण्यासाठी प्रत्येकाने जोशपूर्ण मतदान केले पाहिजे. तरुणांसह ज्येष्ठांनीही मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला पाहिजे, याची जनजागृती करण्यासाठी ‘सकाळ’ आणि जिल्हा प्रशासनातर्फे 
I will vote (मी मतदान करणारच) हा सामाजिक उपक्रम राबविला जाणार आहे. २ मार्चला सकाळी सातला खासबाग मैदान, हुतात्मा स्तंभ, बिनखांबी गणेश मंदिर, महाकाली चौक ते मिरजकर तिकटी या मार्गावर ही मानवी साखळी काढली जाणार आहे. 

जिल्हा प्रशासनाकडून यंदा एक लाख २५ हजार नवमतदारांची नोंदणी झाली आहे. याच तरुणाईसह ज्येष्ठांनीही मतदान करावे, यासाठी जनजागृती म्हणून ‘सकाळ’ व जिल्हा प्रशासनातर्फे जोशपूर्ण आणि भयमुक्त मतदान करणाऱ्यांसाठी 
I will vote हा अनोखा उपक्रम राबविला जाणार आहे.

लोकशाहीत मतदानाचा हक्क पवित्र समजला जातो. हा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचे काम मतदारांचे आहे. याच मतदारांना जागृत करण्यासाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला आहे. याला जिल्हा प्रशासनानेही पाठबळ दिले आहे. मानवी साखळीत जिल्हा परिषद, महापालिका, शिवाजी विद्यापीठ, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्था, सहकारी सेवा संस्था, ग्रामपंचायतींसह सेवाभावी संस्थांचाही सहभाग घेतला जाणार आहे.

लोकांना मतदानाचे महत्त्व समजावे, उमेदवार कोणताही असू दे; पण मतदानाचा आपला हक्क बजावला पाहिजे, मतदानासाठी जाहीर झालेली सार्वजनिक सुटी मतदान करण्यासाठीच केली जावी, असाही संदेश यातून दिला जाईल. याशिवाय, सकाळ यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)चे दीडशे तरुण-तरुणी मतदान हक्क बजावण्यासाठी ‘स्ट्री प्ले’ सादर करतील.

‘सकाळ’ राबवत असलेला I will vote हा उपक्रम खूपच चांगला आहे. लोकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. याचाच भाग म्हणून ‘सकाळ’ आणि जिल्हा प्रशासन हा उपक्रम राबवत आहेत. उपक्रमात जास्तीत जास्त तरुणांनी मतदान करावे, हाच या उपक्रमाचा उद्देश आहे.
- दौलत देसाई,
जिल्हाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com